१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमने-सामने आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमाचे आयोजक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. याप्रकरणी आता शैला कंठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खारघर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कंठे यांनी आपल्या याचिकेत केली आहे. याबाबतचं वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिलं आहे.

“खारघर येथील कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त यांना खारघर येथील वाढत्या तापमानाची कल्पना होती. तरीही त्यांनी सरकारी तिजोरीतील १४ कोटी रुपये खर्च करून उपस्थित नागरिकांसाठी अयोग्य व्यवस्था केली. श्री सेवकांना सात ते आठ तास उन्हात बसवून ठेवलं. त्यामुळे संबंधित १४ जण उष्माघाताचे बळी ठरले,” असं शैला कंठे यांनी याचिकेत म्हटलं आहे.

निष्काळजीपणा आणि अयोग्य व्यवस्थेमुळे ही दुःखद घटना घडल्याचा आरोप कंठे यांनी केला. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली. हा कार्यक्रम आयोजन करून राज्य सरकारने लोकांच्या पैशांचा अपव्यव केला, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं. त्यांनी वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pil file in mumbai high court to seek cbi probe and fir against eknath shinde and devendra fadnavis rmm