श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री गुरुदेव दत्तचा जयघोष करीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी श्रीदत्ताचे दर्शन घेतले. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याला दिलेल्या फाशीच्या पाश्र्वभूमीवर यंदा पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती.
कृष्णा काठच्या नृसिंहवाडी येथील श्री दत्त दर्शनासाठी गुरुपौर्णिमेला दरवर्षी भाविकांची मोठी उपस्थिती असते. शुक्रवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या. मुख व मुख्य दर्शनासाठी चार रांगा लावण्यात आल्या होत्या. उत्तर घाटापासून दर्शनरांग सुरू होती. कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड, कागल, इचलकरंजी, गोरगोटी आदी विविध बसस्थानकांतून तीस जादा एसटी सोडण्यात आल्या होत्या.
शिरोळ तालुक्यातील श्री दत्त देवस्थानामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी ८ ते १२ पंचामृत अभिषेक १२ ते ३ पादुका महापूजा, तीन नंतर पवमान पठण, रात्री साडेसात वाजता धूपदीप आरती व रात्री उशिरा शेजारती झाली. ओंगल (आंध्र प्रदेश) येथील महास्वामी श्री हरिहरनाथ यांच्या हस्ते आणि वेदशात्री अवधूत बोरगावकर, वेदशास्त्री दिलीप उपाध्ये यांच्या उपस्थितीत सकाळी गुरुपूजन झाले. गुरुवारपासून चातुर्मासास सुरुवात झाल्याने पालखी सोहळा बंद झाला असून तो आता दसऱ्यादिवशी सुरू होईल. या ऐवजी इंदूकोटी हा आरती पूजा विधी सुरू करण्यात आला आहे. दत्त देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नछत्राचा लाभ पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी घेतला असल्याचे संयोजकांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी
श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री गुरुदेव दत्तचा जयघोष करीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी श्रीदत्ताचे दर्शन घेतले.
आणखी वाचा
First published on: 01-08-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilgrims celebrated guru purnima with enthusiasm in nrusinhawadi