गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची शनिवारी मोजणी करण्यात आली. साईबाबांना गुरू मानत साईचरणी आपली गुरुभक्ती व्यक्त करताना गुरूला गुरुदक्षिणा म्हणून भाविक भरभरून दान देतात. या तीन दिवसांत ३ कोटी ८ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. यात मंदिर परिसरातील देणगी कक्षात ७५ लाख रुपये,  दानपेटय़ांमध्ये २ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले. शिवाय ३११ ग्रॅम सोने, ७ किलो चांदी अशा स्वरूपातही भाविकांनी साईंच्या झोळीत टाकली.
दि. २९ ते ३१ जुलै या काळात शिर्डी संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या काळात तीन लाख भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. भाविकांनी उत्सवकाळात केलेल्या दानाची शनिवारी मोजणी करण्यात आली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली रोख रकमेची मोजणी दुपारी ३ वाजता संपली. साईभक्तांसह साईबाबा संस्थानचे शेकडो कर्मचारी यांनी ही मोजणी केली. तीन दिवसांत ३ कोटी ८ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. साईबाबा संस्थानच्या आजवर जमा असलेल्या दानाचा विचार केल्यास संस्थानकडे ३७८ किलो सोने, ४ हजार किलो चांदी व विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १ हजार ४४७ कोटी रुपयांची ठेवी जमा आहेत.

Story img Loader