छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेदरम्यान सामूहिक काॅपी होत असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या भेटीदरम्यान निदर्शनास आला होता. याप्रकरणी मीना यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर फुलंब्रीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पर्यवेक्षक, केंद्र संचालक व संस्थेचे अध्यक्ष, सचिवांसह २९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता याप्रकरणात त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून केलेल्या चौकशीनंतर मंगळवारी मध्यरात्री गटशिक्षणाधिकारी क्रांती सीताराम धसवाडीकर यांच्या तक्रारीवरून केंद्र संचालक, ११ पर्यवेक्षक व एक बदली कर्मचारी, अशा तेरा जणांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी दिली.

पिंपळगाव वळण येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाचे केंद्र संचालक योगेश जाधव, पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यू. भोपळे, एस. जी. लोखंडे, ए. एन. सूरडकर, आर. आर. वेताळ, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही. नलावडे या पर्यवेक्षकांसह बदली कर्मचारी एल. के. डोळस, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील चौकशीत आदर्श विद्यालयात परीक्षा देणारे एकूण ६७५ परीक्षार्थींपैकी अनेक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. तसेच ११ परीक्षकांची नियुक्तीबाबत असलेले कागदपत्र व त्यावर त्यांच्या नावासमोर दर्शवलेली त्यांची महाविद्यालय यांची शिक्षक हजेरीत, असे इतर अनुषंगिक बाबींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ पर्यवेक्षक मान्यवर कांशीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडगाव बुद्रुक येथे कार्यरत नाही, असेही दिसून आले. असे असतानाही त्यांना बारावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी पर्यवेक्षण देण्यात आले होते. सोबतच स्वीकृती पत्रही बनावट स्वरुपाचे आढळून आले. तसेच चौकशी सुरू असताना आपण फसले जाऊ या भीतीने ११ पैकी तीन ते चार पर्यवेक्षकांनी दुसऱ्याच एका शाळेतून परीक्षेसाठी कार्यमुक्त झालो आहोत, अशा स्वरुपाची बनावट कार्यमुक्ती प्रमाणपत्र सादर केले.

शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव वळण येथील इयत्ता बारावी परीक्षा संचलनात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या विद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताही सादर केला आहे. – विकास मीना, सीईआे.आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे. – अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी.

Story img Loader