पिंपरी-चिंचवड महापालिका हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धोबीपछाड दिल्यानंतर शरद पवार आता अजित पवारांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. तसेच महापालिकेतील राष्ट्रवादीचे १६ नगरसेवकही शरद पवारांना भेटले. हे सर्वजण शरद पवारांकडे परतण्यास इच्छूक असल्याचा दावा काही वृत्तपत्रांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटातील आमदार शरद पवारांच्या पक्षात परतण्यास इच्छूक असल्याचे दावे शरद पवार गटातील नेते करत आहेत. अशातच आता पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेत आहेत. पिंपरी चिंचवड महापलिकेमधील नगरसेवकांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले, पक्षात परतण्याची इच्छा असलेल्या लोकांना भेटण्यासाठी मला रोज दोन ते तीन तास काढावे लागत आहेत. आजही काही लोक आम्हाला भेटायला येणार आहेत. पक्षात येणारे लोक खूप आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा अपवाद नाही. तिथल्या अनेक नगरसेवकांनी आमची भेट घेतली आणि ते पक्षात परतण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला आनंद आहे की त्या सर्वांना आता असं वाटतंय की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र यायला हवं. तसेच त्यांनी जो काही निर्णय अलीकडच्या काळात घेतला तो हिताचा नव्हता. या निष्कर्षाने ते परत येऊ लागले आहेत आणि ते परत आल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले, “आमच्या सहकारी पक्षांना…”

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आहे. त्या सरकारचे पहिलेच अधिवेशन चालू आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे, जेडीयू आणि टीडीपी पक्षातील खासदार मोदी सरकारवर नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लावले जात आहे. याबाबत शरद पवारांना विचारल्यावर ते म्हणाले, माझ्या ऐकण्यात असं काही आलेलं नाही. उद्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत सगळा अंदाज येईल. त्यामुळे आता स्पष्ट सांगायचं झाल्यास कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटत आहेत. आता काही गडबड झाली तर निवडणुकीला समोरं जावं लागेल.