नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकरोड भागात विनापरवाना पिस्तूल बाळगताना संशयिताला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडेही दोन जिवंत काडतुसे सापडली होती. यापाठोपाठ पुन्हा विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगण्याचा हा प्रकार उघड झाला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास समाधान अर्जुन थोरात (२३, भोरमळा, कुंदन लॉन्सजवळ, एकलहरा रस्ता) हा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पदपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या वेळी त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी थोरात विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील शिवाजी पुतळा उड्डाण पूल परिसरातून समीर नूरमहंमद शेख आणि महंमद दस्तगीर महंमद अशा या दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुसांसह हस्तगत करण्यात आले होते. शहरात यापूर्वी देशी-विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या काही जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यातील बहुतेक संशयित पिस्तुलाची विक्री करण्यासाठी शहरात दाखल होत असल्याचे दिसते.
मध्यंतरी पुणे शहरात विनापरवाना पिस्तूल बाळगण्याचे तरुणांमध्ये आकर्षण निर्माण झाल्याची बाब उघड झाली होती. तसे काही प्रकार नाशिकमध्ये फोफावू नयेत, याकरिता पोलिसांनी विनापरवाना पिस्तूल विक्री करणाऱ्यांबरोबर त्या खरेदीची इर्षां बाळगणाऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा