लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) आज, सोमवारी उत्साहात व शांततेत पार पडली. ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली नमाजनंतर मैदानावर ‘एमआयएम’ पक्षाच्या वतीने वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शवणारे फलक झळकावण्यात आले. एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती दिली.

दरम्यान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदानावर व्यवस्था केली नसल्याने मुस्लिम समाजाकडून नाराजी व्यक्त केली. दरवर्षी महापालिकेच्या वतीने ईदगाह मैदान येथे मांडव टाकून शांतता समितीचे सदस्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी नमाजसाठी मैदानावर उपस्थित असलेल्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देतात. मात्र यंदा अशी कोणतीही व्यवस्था न केल्याने व प्रशासनातील अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

गतवर्षी ईदच्या सामुदायिक नमाजनंतर काही तरुणांनी ईदगाह मैदानावर इस्राइलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारे फलकही झळकावले होते. यंदा वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करणारे फलक झळकावण्यात आले. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी या घटनेला दुजोरा दिला.

नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजान महिन्यात केलेल्या रोजा (उपवास) सांगता ईदच्या दिवशी होते, रमजान महिन्याच्या २९ उपवासानंतर रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने, सोमवारी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातील मशीदींमध्ये सकाळी सातपासूनच ईदच्या नमाजाची व्यवस्था करण्यात आली होती. सामुदायिक नमाजनंतर धार्मिक एकात्मता व देशाच्या समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. इदगाह मैदान परिसरात विविध खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. ईद सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही गर्दी झालेली होती.

ईद शांततेत साजरे होण्यासाठी पोलिसांनी ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात बंदोबस्त तैनात ठेवला होता. कोठला भागातून जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीच्या मेजवानीचा बेत होता. रविवारी झालेला गुढीपाडवा, सोमवारी झालेली ईदचा मोठा उत्साह शहरात दिसून आला. दिवसभर समाज बांधव एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा परस्परांची गळाभेट घेऊन देत होते.