महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना शहरातील मोबाइल टॉवर, होर्डिगचे सर्वेक्षण करून त्यावरील कराची फेरआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. कापड बाजारातील ‘कोहिनूर’ दुकानामागे असलेला खासगी मालकीचा व आरक्षित मोकळा भूखंड (ओपन स्पेस) भूसंपादन करून ताब्यात घेण्याचा व तेथे ‘पे अँड पार्क’ तत्त्वावर वाहनतळ राबवण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. अंदाजपत्रकावरील सभेत सदस्यांनी मोबाइल टॉवर, होर्डिग्ज यावरील करआकारणीतील अंदाधुंदी, मनपा शाळांचा दर्जा व घटती विद्यार्थिसंख्या, कचरा गोळा करणा-या घंटागाडय़ांची परिस्थिती व त्यातून होणारी डिझेल चोरी, कोंडवाडा व मोकाट कुत्री आदी प्रश्नांवरून प्रशासनास धारेवर धरले. कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील निवासस्थाने विस्तारीकरणासाठी कर्मचाऱ्यांना महिनाभरात खाली करायला लावण्याचा, केडगावमध्ये उभारलेले अग्निशमन दलाचे केंद्र दोन आठवडय़ांत सुरू करून तेथे एक वाहन ठेवण्याचा, भाडय़ाने दिलेल्या शाळाखोल्या थकबाकी न दिल्यास पुन्हा ताब्यात घेण्याचा, दुर्धर आजारासाठी दिल्या जाणाऱ्या महापौर मदतनिधीसाठी लागू केलेली बीपीएल यादीत नाव समाविष्ट असल्याची अट शिथिल करण्याचा व या निधीची तरतूद वाढवून २० लाख रु. करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बाळासाहेब बोराटे, गणेश भोसले, किशोर डागवाले, कैलास गिरवले, अजिंक्य बोरकर, अभिषेक कळमकर, दीप चव्हाण, संजय घुले, नसीमा शेख आदींनी विविध प्रश्न उपस्थित करत सूचना केल्या. शहरात सुमारे ५०० हून अधिक मोबाइल टॉवर असताना तीन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात १२७ टॉवर आढळले. त्यातील केवळ ३६ला परवानगी देण्यात आली, त्यानंतर सर्वेक्षण झाले नाही. पुणे रस्त्यावर १२६ होर्डिग्जसाठी, सावेडी रस्त्यावर ४४२, त्यातील ७१ मनपाच्या जागेत आहेत, परंतु केवळ २७८ होर्डिग्जचे पैसे जमा झाले आहेत. परवानगी ४० बाय २० फुटासाठी दिली जाते, प्रत्यक्षात मात्र अनेक पटीत मोठे होर्डिग्ज उभारले जातात, त्याची करआकारणी होत नाही. टॉवर व होर्डिग उभारणाऱ्या घरांनाही व्यावसायिक घरपट्टी आकारावी अशी सूचना करण्यात आली.
गांधी मैदानात पे अँड पार्क उभारण्यावरील चर्चेत शहरात १९ ठिकाणे त्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिसूचना अद्याप काढण्यात आलेली नाही, अशी माहिती देताना कापड बाजारातील कोहिनूर दुकानामागे असलेला खासगी मालकीच्या मोकळय़ा भूखंडावर पार्किंगचे आरक्षण असल्याने भूसंपादन करून तो ताब्यात घेण्याचा व तेथे पे अँड पार्क राबवण्याचे ठरले.
बजेट फुगवले
अंदाजपत्रक फुगवून ६०४ कोटीचे केल्याचा आरोप दीप चव्हाण यांनी केला. सन २०१२-१३चे मूळ बजेट १६२ कोटींचे होते व खर्च १३५ कोटी झाला. केंद्र व राज्याच्या योजनांसाठी १० टक्क्यांची तरतूद केलेली नाही. संकलित कराची वसुली केवळ ४० टक्केच झाली आहे, ५२ कोटींची देणी आहेत, त्यामुळे यंदाचे मूळ अंदाजपत्रक केवळ २०० कोटींचे आहे, त्यामुळे नागरिकात गैरसमज होतो तसेच आता प्रभागातील विकासकामांना निधीच शिल्लक नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.
विविध तरतुदी
चितळे रस्त्यावरील नेहरू भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्यास खासगीकरणातून प्रतिसाद न मिळाल्यास मनपा हा प्रकल्प उभारेल, घनकचरा व्यवस्थापनासाठी बुरुडगाव रस्त्यावर सव्वादोन कोटींचा खत प्रकल्प व भूभरण क्षेत्र करणार, मनपाच्या शाळांत ई-लर्निग उपक्रम सुरू करणार, शहर व उपनगरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्हीची व्यवस्था करणार, ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मदत, महालक्ष्मी उद्यान व सिद्धीबाग खासगीकरणातून विकसित करणार, उपनगरातील ओपन स्पेसवर जॉगिंग पार्क उभारणार, सावेडी व केडगावमध्ये स्मशानभूमी उभारणार आदी सुविधांच्या तरतुदी करण्यात आल्याची माहिती महापौर जगताप यांनी दिली.
पे अँड पार्कसाठी कापड बाजारात जागेचे संपादन
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना शहरातील मोबाइल टॉवर, होर्डिगचे सर्वेक्षण करून त्यावरील कराची फेरआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला.
First published on: 07-07-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Place in textile market for pay and park