शहरात मेट्रो रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानकांसाठी जागेची गरज भासणार असून, त्या मिळविणार कशा, ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच आहे. जागांच्या अधिग्रहणाच्या प्रश्नामुळे प्रकल्प लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक-मेट्रो डेपो या मार्गावर १८, तर प्रजापतीनगर-लोकमान्यनगर या मार्गावर १९ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. कमीतकमी जमीन लागेल व इमारतींची कमीतकमी तोडफोड होईल, या दृष्टीने मार्ग आखण्यात आले आहेत. सध्या निश्चित केलेल्या मार्गांवर रस्त्याच्या मध्यभागी सुमारे दहा मीटर उंचीचे स्तंभ उभारून त्यावर मेट्रोसाठी काँक्रिटची स्लॅब टाकून मार्गाची आखणी केली जाईल. हे दोन्ही मार्ग दुहेरी असतील.
ऑटोमोटिव्ह चौक-मेट्रो डेपो या मार्गावर गड्डीगोदाम, झिरो माईल्स, सीताबर्डी, देवनगर, मयुरेश अपार्टमेंट, तसेच प्रजापतीनगर-लोकमान्यनगर या मार्गावरील नेताजी मार्केट, झाशी राणी चौक या स्थानकांसाठी जागेची अडचण भासू शकते. मुंजे चौकात या दोन्ही मार्गाचे जंक्शन आहे. किमान क्रॉसिंग असले तरी दोन्ही मार्गाची स्थानके स्वतंत्र ठेवावी लागतील. बारा डब्यांची गाडी राहील, असे सांगितले जात. ही गाडी जाणार असल्याने तेथेही दोन्ही बाजूंनी लांब व विस्तीर्ण जागा लागेल. या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत.
हिंगणा मार्ग परिसरात संरक्षण खात्याची तसेच उत्तर भागात अशा दोन जागा अधिग्रहित कराव्या लागतील, असे आधीच स्पष्ट करण्यात आले असले तरी या स्थानकांसाठी जागा कशी मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंजुरी वेळेवर मिळून कामही वेळेवर सुरू झाले तरी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणासाठी वेळ लागून परिणामी प्रकल्पही लांबू शकतो, असे अनेकांना वाटते. प्रत्येकी बारा डब्यांच्या तीन गाडय़ा येतील. याआधी एल.अँड टी. व रेंबॉल्ड कंपनीने २००८ मध्ये नागपूर शहराचे सर्वेक्षण केले तेव्हा चार मेट्रो मार्ग प्रस्तावित होते. विमानतळ परिसरात २०८६ हेक्टर जमीन एसईझेडसाठी राखीव असून, त्यापैकी मिहानला १ हजार ४७२ हेक्टर जमीन देण्यात आली आहे. देशात एखाद्या प्रकल्पासाठी देण्यात आलेली ही सर्वाधिक जमीन आहे.
मेट्रो रेल्वेच्या पहिल्या मार्गासाठी मिहान प्रकल्पाजवळ ३३.९० हेक्टर जागेवर, तर दुसऱ्या मार्गासाठी नीलडोह येथे १५.२४ हेक्टरवर डेपो उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ७७.६८ हेक्टर शासकीय जमीन, तर ५.३० हेक्टर खासगी जमिनीची गरज भासणार आहे. त्यासाठी १०१ ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड कंपनी स्थापन केली जाईल.
नागपूरची लोकसंख्या सध्याच २५ लाखांवर पोहोचली आहे. शिवाय, १२.३७ लाख वाहने रोज रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी १०.३२ टक्के दुचाकी आहेत. ६४.८१ टक्के लोक खासगी वाहनांचा वापर करतात. ३३.७५ टक्के लोक दुचाकी वापरतात. ३१.१६ टक्के लोक कार वापरतात. या प्रकल्पासंबंधी २००८ मध्ये एल. अँड टी. व रेंबॉल्ड कंपनीने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणातील ही आकडेवारी आहे. लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत तीव्र गतीने वाढ होत आहे. केंद्र शासनाची लवकर मंजुरी मिळून वेळेत काम सुरू होईल, यात शंका नसली तरी जागेची अडचण निर्माण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. मेट्रो सुरू झाल्यास २०१६ मध्ये सुमारे ३ लाख लोक मेट्रोने प्रवास करतील. शहरातून दहा टक्के प्रवासी मिहानला जाणारे असतील, असा अंदाज आहे.