कराड : कराड तालुक्यातील पाणीटंचाईच्या संकटातील २५ गावांचा प्रामुख्याने आराखडा बनवण्यात आला आहे. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १३ तर, उत्तरेतील १२ गावांचा समावेश आहे. त्याशिवाय तालुक्यातील ४२ गावांचा टंचाई आराखडा स्वतंत्रपणे केला आहे. त्यात दक्षिणेतील २१ तर, उत्तरेतील २१ गावांवर लक्ष असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याच्या खर्चाला जिल्हा नियोजनमधून मंजुरी घेऊ. ओंड येथे बंदिस्त वाहिनीने पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी पाठपुरावा केल्याने त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. बंदिस्त वाहिनेने ओंडला पाणीपुरवठा झाल्यास गावाला कधीही टंचाई भासणार नाही. त्याचा प्राथमिक आराखडा २५ कोटींचा असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. कराड दक्षिणेत ९० गावांना पाणी योजना मंजूर आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या योजना झालेल्या नाहीत तरी या योजनांची माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जिल्ह्याच्या टंचाईसंदर्भातील बैठकीत पालकमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे भोसले यांनी संगितले.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा संकुलला राज्य सरकाने २५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यात आणखी १० कोटींची वाढ केली केल्याने ३५ कोटींचा निधी मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण कराडला महसूल कॉम्प्लेक्स व्हावे, अशी मागणी केली असून, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत बावनकुळेंनी कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. तेथेच महसूल भवनही येत्या काळात करायचे असल्याचे भोसले यांनी सांगितले. कराड पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुचनेवरून २५ कोटींचा प्रस्ताव मंजूर असून, त्यातील १५ कोटी तातडीने मिळणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
४२ गावांचा समावेश
कराड तालुक्यात प्रशासनाने संभाव्य टंचाईजनक स्थितीही गांभीर्याने घेऊन त्यावर मात करण्याची पूर्वतयारी केली आहे. टंचाईच्या आराखड्यात ४२ गावांचा समावेश असून, दक्षिण व उत्तरेतही प्रत्येकी २१ गावे आहेत. प्रत्यक्ष टंचाई घोषित केलेली गावे २५ असल्याने प्रामुख्याने त्या गावांत टंचाईचा आराखडा बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. टंचाई निवारण करण्यात कुठेही कसर राहणार नसल्याची ग्वाही आमदार डॉ. भोसले यांनी या वेळी बोलताना दिली.