वसई-विरार शहरातील पूरसमस्या आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योजना

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : पावसाळ्यातील शहरात निर्माण होणारी पूरसमस्या आणि दुसरीकडे पाणीटंचाई अशा दुहेरी संकटांना नागरिकांना तोड द्यावे लागते. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आता रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून पाण्याची भूजल पातळी वाढविणार आहे. त्याअंतर्गत डोंगर परिसरातून येणारे पावसाचे पाणी शहरात न सोडता त्याच ठिकाणी जमिनीत मुरवले जाणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

वसई-विरार शहराच्या पूर्वेला डोंगररांगा आहेत. त्याच्या खाली मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पावसाळ्यात या डोंगरावरून मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी वाहून शहरात जाते. शहरात आधीच नियोजनाअभावी झालेली बांधकामे, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या अनधिकृत चाळी यामुळे पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे पाणी शहरात साचून पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागील वर्षी शहरात चार ते पाच वेळा पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. एकीकडे पावसाळ्यात पुराची समस्या असताना ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असते. उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा होत असल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाण्याची पातळी खोल गेल्याने विहीर तसेच बोअरवेलना पाणी लागत नाही. या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणून पालिकेने भूवैज्ञानिकांच्या मदतीने रिचार्ज शाफ्ट ही योजना लागू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली भूवैज्ञानिकांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. योजनेच्या माध्यमातून पावसाचे पाणी शहरात न जाता त्याचा सरळ जमितीत निचरा केला जाणार आहे.

या योजनेचे काम प्राथमिक स्वरूपात सुरू केले आहे. यासाठी वसई-विरारमधील भूस्तराचा अभ्यास सुरू आहे. यात भूस्तराची पाहणी करून कोणत्या ठिकाणी भूजल पातळी किती आहे याचे सर्वेक्षण सुरू आहे. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी सरळ सागरी खाडीत न जाता ते त्याच ठिकाणी जमिनीत सोडण्यासाठी रिचार्ज शाफ्ट (बोरिंग) खोदण्यात येणार आहेत.

या योजनेची सध्या प्राथमिक स्वरूपात चाचणी केली जाणार आहे. यासाठी पेल्हार येथील व वसई गोल्डन चॅरिएट हॉटेल परिसरात असलेल्या दोन मोठय़ा नाल्यावर चाचणी २० बोरिंग खोदण्यात येणार आहेत. यामुळे पावसाचे पाणी शहरात न जाता सरळ जमिनीत मुरले जाईल. यामुळे शहराला पुराचा फटका बसणार नाही. तसेच या परिसरातील भूजल पातळी वाढली जाऊन उन्हाळ्यातसुद्धा या परिसरातील पाण्याचे स्रोत अबाधित राहतील, असे पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती देताना पालघर प्रभारी भूवैज्ञानिक प्रमोद पोळ यांनी माहिती दिली की, सध्या प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू आहे. आम्ही शहर आणि आसपासच्या परिसरातील भूस्तराची पाहणी केली आहे. याचे भूस्तर चाचणी अहवाल तयार केले आहेत. सध्या ज्या ठिकाणी पाणी साचले जाते, याची माहिती मिळवली आहे. ही योजना यशस्वी राबविल्यानंतर येणाऱ्या काळात वसईत पूरस्थितीला आळा बसेल तर जिथे २०० फुटांवर पाणी लागत नाही तिथे ५० ते १०० फुटांवर पाणी लागेल.

पूरसमस्या दूर करण्यासाठी शहरात येणारे पाणी रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ही योजना राबवून पाण्याचा शहराबाहेरच निचरा होईल, अशी व्यवस्था करणार आहोत. सध्या भूस्तराचा अभ्यास सुरू असून त्यानंतर योजना पुढे कार्यान्वित होईल.

गंगाथरन डी. आयुक्त,वसई-विरार महापालिका

या योजनेनंतर भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जमिनीत पाणी मुरल्यानंतर त्याचा फायदा उन्हाळ्यात विहिरी आणि बोअरवेलला होणार आहे.

– प्रमोद पोळ, प्रभारी भूवैज्ञानिक पालघर

Story img Loader