स्वच्छतेचा झिराड पॅटर्न

प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणावर घातक परिणाम होत असले तरी त्यांचा वापर सार्वत्रिक झाला आहे. २५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यावर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांचा वापर रोखण्यात अद्याप यश आलेले नाही.

अशा प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालायची असेल तर ग्राहकांना ठोस पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन झिराड ग्रामपंचायतीने प्रत्येक घरटी दोन बास्केट उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे प्लास्टिक पिशव्यांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

देशभरात स्वच्छ भारत मिशन जोमाने राबविण्यात येत आहे. घरातील स्वच्छतेबरोबर, परिसर स्वच्छता राखण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. याचे चांगले परिणाम आता ग्रामीण भागातही दिसण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ातील झिराड ग्रामपंचायत याचे चांगले उदाहरण आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. गावातील व्यापाऱ्यांची बठक बोलावून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोखायचा असेल तर सक्षम पर्याय देणे गरजेचे असल्याचे या वेळी समोर आले. यातूनच गावातील प्रत्येक घराला खरेदीसाठी बास्केट उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले.

गावात साडेतीनशे ते चारशे घरे आहेत, या सर्वाना ग्रामपंचायतीने प्रत्येकी दोन बास्केट उपलब्ध करून दिल्या. एका बास्केटचा वापर हा मटण, चिकन, मच्छी आणण्यासाठी करावा आणि दुसरी बास्केट ही भाजीपाला आणि किराणा मालासाठी वापरावी असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. स्थानिक लोकांना यापुढे व्यापाऱ्यांनी पिशव्या देऊ नयेत, असा आदेश जारी केला. त्यामुळे गावातील कचऱ्याचे प्रमाण तीस टक्क्यांनी घटण्यास मदत झाली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला शक्य होणार नाही. त्यामुळे घरापासूनच कचऱ्यांची निर्मिती रोखणे गरजेचे असल्याचे मत सरपंच दर्शना भोईर यांनी स्पष्ट केले. बाहेरून खरेदीसाठी गावात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे कागदी पिशव्या देण्यात याव्यात. असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामपंचायतीने स्वनिधीचा वापर करून हा उपक्रम राबविला आहे. येत्या चार महिन्यांत संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील आदर्श गाव म्हणून झिराड विकसित करण्याचा मानस असून गावात झिराड गावातील मुख्य रस्त्यावर १७ सीसीटीव्ही कॅमेरे, ३२ पथ दिवे लावण्यात आले आहेत. यामुळे गावातील सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे.   स्वच्छता ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून ती सार्वत्रिक जबाबदारी आहे. लोकांनी यासाठी पुढे येऊन सहकार्य केले.

गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही हे या गावाने दाखवून दिले आहे. रायगडातील इतर गावांनी यातून प्रेरणा घेतली तर निर्मल रायगडचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Story img Loader