जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या प्रेरणेने स्वच्छता मोहीम धूमधडाक्यात सुरू असतानाच दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या ‘प्लास्टिक कॅरी बॅग मुक्त दापोली’ मोहिमेला एक आगळावेगळा सन्मान प्राप्त झाला आहे. कोकरे यांची ही मोहीम ‘मॉडेल’ म्हणून राबविण्याच्या सूचना शासनाच्या पर्यावरण विभागाच्या सचिव वत्सला नायर यांनी दिल्या आहेत. तर याच मोहिमेवर आधारित ‘दुसरी अगस्त क्रांती’ या माहितीपटाला अहमदनगरच्या ‘प्रतिबिंब फिल्म फेस्टिव्हल’मध्ये  ‘सवरेत्कृष्ट माहितीपट’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या दुहेरी सन्मानामुळे दापोलीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून त्यांनी याचे श्रेय कोकरे यांना असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, हा सन्मान माझा एकटय़ाचा नसून ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून झटणाऱ्या दापोली शहरातील तमाम आबालवृद्धांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया कोकरे यांनी ‘लोकसत्ता’शी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केली. ते सध्या लातूर जिल्ह्य़ातील आवसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. तत्पूर्वी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम करताना कोकरे यांनी दापोली शहर प्लास्टिक कॅरी बॅग मुक्त करण्याची मोहीम राबविली होती. त्यांच्या मोहिमेला नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, लहान-सहान विक्रेते, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि पत्रकारांनी सक्रिय पाठिंबा दिला. परिणामी अवघ्या पंधरा दिवसांत प्लास्टिक पिशव्यांसह बाटल्या दापोलीतून गायब झाल्या.
दरम्यान, कोकरे यांची दापोलीतून आवसा येथे बदली झाल्यामुळे ही मोहीम थंडावेल, अशी टीका करणाऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. कारण ही मोहीम कोकरेंनी सुरू केलेली असली तरी ती आम्हा सर्वाच्या हितासाठीच असल्याने ती अव्याहतपणे कायम टिकविण्याची जबाबदारीही आमचीच आहे. आणि याच भावनेतून दापोलीवर जोपासत आहे. त्या वेळी कोकरे यांच्या मोहिमेचे अनुकरण खेड, रत्नागिरी व राजापूर नगर परिषदांनीही केले. तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड आदी ठिकाणी कोकरे यांना मार्गदर्शनासाठी बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. आवसा न. प.चे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर तेथेही त्यांनी ही मोहीम राबवून अवघ्या सात दिवसांत आवसा शहराला प्लास्टिक कॅरी बॅगपासून मुक्त केले आहे. त्याचे अनुकरण लातूर व उमरगा नगरपालिकांनी केले.
दापोलीतील ‘त्या’ मोहिमेमुळे राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत दापोली नगरपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तसेच वसुंधरा पुरस्कार-२०१२ ने सन्मानित करण्यात आले. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांनी कोकरे यांच्या मोहिमेला पाठबळ देऊन त्यांना प्रोत्साहन दिले होते. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकरे यांचे विशेष कौतुक केले. पर्यावरण सचिव वत्सला नायर यांनी एका पत्राद्वारे कोकरे यांच्या मोहिमेला शुभेच्छा देऊन ही मोहीम राज्यातील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांनी राबवावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. अहमदनगर येथील ‘प्रतिबिंब फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दापोली मोहिमेवर आधारित ‘दुसरी अगस्त क्रांती’ या माहितीपटाला ‘सवरेत्कृष्ट माहितीपट’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच आंध्र प्रदेश येथील  ‘करून सोसायटी फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये रामदास कोकरे यांनी दापोलीमध्ये राबविलेल्या मोहिमेचा संदर्भ दिला असल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष पेमेन्टाइन पाऊच यांनी मेलद्वारे कोकरे यांनी दिली आहे. ही संस्था प्लास्टिक कॅरी बॅग निर्मूलनासाठी कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय सेवेत असताना समाजासाठी काही तरी चांगले करण्याची माझी धडपड असते. प्लास्टिक कॅरी बॅग, बाटल्या आदींच्या विळख्यात सापडलेल्या समाजाची यातून सुटका व्हावी, त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या एकमेव प्रामाणिक उद्देशाने समाजाच्याच सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगून आता या दापोली मोहिमेचे ‘मॉडेल’ म्हणून राज्यभरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हा माझा एकटय़ाचा सन्मान नसून दापोलीकरांसह सर्वाचाच सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया रामदास कोकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

Story img Loader