माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच आहे असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा आहे असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर मावळा म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी माझी जात विचारू नका मी शिवरायांचा मावळा आहे असं म्हटलं आहे.
आपल्या जुन्नर येथील भाषणात अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या एअर स्ट्राईकवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सर्जिकल स्ट्राईक नेमका कधी झाला ते माहित नाही पण पेट्रोल डिझेलची दरवाढ मात्र नक्की झाली असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती याआधीच सूत्रांकडून मिळाली होती. आता जुन्नर येथील मेळाव्यात त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका मला साकारायला मिळाल्या हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या वेशातले माझे फोटो बॅनरवर लावू नका असंही आवाहन अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं.