पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे. बारामती या ठिकाणी एका मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंबाबतही शरद पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. मी काम करत असताना पक्षाचा विचार केला नाही, माझ्या विचारांशी पक्कं राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे मागच्या ५६ वर्षांपासून निवडून येतो आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीची स्थापना मी केली

शरद पवार त्यांच्या भाषणात म्हणाले, “मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणलं होतं. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत. ते वेळ देतात, कष्ट करतात.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- बड्या नेत्याच्या दबावामुळे बारामतीमधील व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द; पूर्वी असे कधी घडले नसल्याची शरद पवार यांची नाराजी

मोदींबाबत काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले होते. त्यावेळी म्हणाले होते की माझं बोट धरुन राजकारणात आले. असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

संसद संस्था आपण जतन केली पाहिजे. मागे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात पंतप्रधान २४ मिनिटं आले. संसदेत बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही, असे असेल तर लोकशाही धोक्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान संसदेत आहे, त्यांनी कधी असा विचार केला नाही. यातून असे दिसत की, या संस्थाबद्दल त्यांना आस्था वाटत नाही. डॉक्टरांचा आणि माझा फार संपर्क आलाय. त्यांना म्हणालो, माझं काम चालू द्या बाकी काय करायचं आहे ते करा. वकील आणि वैद्यकीय क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi and i have good relationship but i don not agree with his policies says sharad pawar rno news scj