देशभरात सध्या चर्चा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची! या यादीमध्ये असलेली नावं आणि त्यांच्या खातेवाटपावरून देखील देशात मोठी राजकीय चर्चा सुरू झालेली असताना विरोधकांकडून त्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली जात आहे. काँग्रेसनं यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र टीका केली आहे. “मोदी सरकार गेल्या ७ वर्षांपासून फक्त एन्जॉय करत आहे आणि सत्तेचा आनंद उपभोगत आहे. पण त्यासोबतच ते लोकांना बरबाद करत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, त्याने काहीही फरक पडणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्या म्हणजेच ८ जुलै रोजी काँग्रेसकडून राज्यभर सायकल रॅलीमार्फत आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर सायकल मार्च काढला जाणार आहे. मोदी सरकारची धोरणं आणि देशातील वाढती महागाई, यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून ही सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली. तसेच, ते स्वत: देखील नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणाऱ्या सायकल रॅलीमध्ये सहभागी असणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं.

“फेरबदल करूनही पाप धुतलं जाणार नाही”

“मोदी सरकार गेल्या ७ वर्षात फक्त एन्जॉय करत आहे. सत्तेचा आनंद उपभोगत आहे आणि लोकांना बरबाद करत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा न करा, त्याने काही फरक पडत नाही. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना विचारलं असता त्यांच्याकडे फाईल देखील जात नाहीत असं कळतं. सगळा कारभार पीएमओ चालवत आहे. लोकतंत्र संपलेलं आहे. फेरबदल करूनही ही पापं त्यांना धुवून काढता येणार नाहीत”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

..तर मी माझे शब्द मागे घेतो; आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर नितेश राणेंचं विधान

“मोदींनी जनतेचं जगणं मुश्किल केलंय”

“मोदींनी देशाच्या जनतेचं जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. काँग्रेस कायम देशाच्या जनतेसोबत राहिली आहे. सरकार लोकांसाठी असतं, ते नफा कमावण्यासाठी नसतं हे काँग्रेसनं दाखवून दिलं आहे. पण देशात मोदींचं सरकार आल्यापासून कृत्रिमरीत्या महागाई वाढवली आहे. उज्ज्वला योजनेतून गरीबांच्या घरी सिलेंडर पोहोचला, पण महागाई वाढवल्यामुळे गॅस मिळू शकत नाहीये. त्यात रॉकेलही बंद केलं आहे. मग लोकांनी जगायचं कसं? गॅस सबसिडी देखील मोदी सरकारने काढून टाकण्याचं काम केलं आहे. त्याविरोधात आमचं आंदोलन असणार आहे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi cabinet 2 0 reshuffle congress nana patole slams bjp government on inflation pmw