सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं आज (४ जानेवारी २०२१ रोजी) पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं सांगत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय. मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सिंधुताईंचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात.
यंदाच्या वर्षी सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्याच सोहळ्यामधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचा सिंधूताईंचा फोटो मोदींनी शेअर केलाय. “डॉक्टर सिंधुताई सपकाळ या कायमच त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी लक्षात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक मुलांना चांगलं जीवन जगता आलं. त्यांनी उपेक्षित वर्गातील सामाजासाठीही बरंच काम केलं आहे. त्यांच्या निधनामुळे फार दु:ख झालं आहे. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियांबरोबर आणि हितचिंतकांसोबत आहेत. ओम शांती,” असं ट्विट पंतप्रधान मोदींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> सिंधुताई मुख्यमंत्र्यांना फोन करुन म्हणाल्या होत्या, “उद्धवा महाराष्ट्र…”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, “सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांमध्ये सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय.