पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदींच्या दौऱ्यावरून टीका केली आहे.
“हा दौरात पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरीत दिसतो. आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन केलेला दिसतो आणि शिवसेना हे समजते की ज्या अर्थी पंतप्रधान निवडणुकीच्या हेतूने येतात. याचा अर्थ इथलं स्थानिक नेतृत्व कुचकामी आहे.” असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
याशिवाय, “पंतप्रधानांचं मुंबईत आणि या छत्रपती शिवरायांच्या भूमीत स्वागत आहे. परंतु जे काम महापालिका कार्यरत असतानाच, शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच कामाचं भूमीपूजन होतंय. काही कामावरती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि बाहेर सुद्धा आरोप केले होते. जी कामं सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सुयोग्य पद्धतीने केलेले आहेत, त्याही कामाचं आज पंतप्रधान मोदी भूमीपूजन करत आहेत. परंतु ही सगळी कामे शिवसेनचा महापौर पदावर असतानाच मंजूर झालेली आहेत आणि त्याचं भूमीपूजन आज पंतप्रधान करत आहेत.”असंही दानवेंनी सांगितंल. एबीपी माझाशी ते बोलत होते.
याचबरोबर, “मला वाटतं गर्दी जमवण्यासाठी, राजकारण करण्यासाठी ही सभा होते आहे. कामगारांना सुद्धा जी केंद्राची योजना आहे, लाख कामगारांना देणार म्हणून लाख कामगारांना तिथे बोलावलेलं आहे. प्रत्यक्षात किती जणांना देतील हा प्रश्नच आहे. परंतु मला असं वाटतं की या माध्यमातून एक राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार भाजपा करते आहे.” असा आरोपही दानवे यांनी केला आहे.