गुढीपाडवा या दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. तर त्याच दिवशी संध्याकाळी राज ठाकरेंनी घणाघाती भाषण केलं. याबाबत ‘दृष्टीकोन’ या लोकसत्ताच्या विशेष कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भूमिका मांडली आहे. या दोन्ही घटनांमागे काय अर्थ असू शकतात हे त्यांनी या व्हिडीओत उलगडून सांगितलं आहे.
काय म्हणाले गिरीश कुबेर?
गुढीपाडव्याला दोन घटना महाराष्ट्रात घडल्या, त्यावर दृष्टीक्षेप टाकणं आवश्यक आहे. पहिली घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथली आणि दुसरी घटना महाराष्ट्राची राजधानी मुंबईतली. पहिली घटना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट, त्यांचं भाषण, त्यांचा तिथला वावर या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंची मुंबईतली पाडव्याची सभा.
नरेंद्र मोदी आणि संघ मुख्यालयाची भेट याबाबत काय म्हटलं आहे गिरीश कुबेर यांनी?
पहिल्या घटनेचं महत्त्व असं की, पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर संघ मुख्यालयाची त्यांची पहिली भेट. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. त्याआधी त्यांनी २०१२ मध्ये आणि २०१३ मध्ये त्यांनी संघ कार्यालयाला भेट दिली होती. मधल्या काळात ते नागपूरमध्ये आले नव्हते का? तर ते आले होते पण संघ कार्यालयात गेले नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली भेट भाजपा ज्यांना कडवा शत्रू मानतं, अत्यंत भ्रष्ट अशी संभावना करतं. त्या शरद पवारांच्या बारामतीला त्यांनी पहिली भेट दिली होती. मात्र संघ कार्यालयाला भेट द्यायला त्यांना ११ वर्षे लागली. २०१२ मध्ये तेव्हा मनमोहन सरकारचा पाया डळमळीत होऊ लागला होता. २०१३ मध्ये संघाच्या पाठिंब्याची गरज नितांत दिसत होती. २०१४ नंतर २०१९ च्या निवडणुकीला भाजपाला कुणाचीच गरज नव्हती. २०२४ ला मात्र भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या वातावरणाचा फुगा किती मोठ्या प्रमाणात आवाज होऊन फुटला ते सगळ्यांनीच पाहिलं. त्यामुळे मोदी यांनी संघ मुख्यालयाला दिलेली भेट महत्त्वाची ठरते.
कुणी स्वतःला देव समजू नये अशा कानपिचक्या संघाने का दिल्या?
लोकसभा निवडणुकीचा निकाल असा लागला नसता तर नरेंद्र मोदी तिकडे गेले असते का? राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो. पण २०१२ आणि २०१३ नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते. त्यानंतर भेट देण्यासाठी ११ वर्षे लागली. २०२४ च्या निवडणुकांमध्ये आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काम करुन आपण काय करु शकतो याचा एक दरारा निर्माण केला. त्यामुळे मोदींची ही भेट आवश्यक ठरली का? असा प्रश्न निर्माण होतो. भाजपाचे टीकाकारही हा प्रश्न निर्माण करु शकतात. ४०० पारचा नारा दिला गेला त्यावर्षी अयोध्या या मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला आहे. ३०० जागांचा दावा केला असता तसा निकाल आला असता आणि अयोध्येची जागा गेली असती तर भाजपाला वेदना झाल्याच असत्या. कारण जिथे राम मंदिर उभं राहिलं तिथे पाठिंबा मिळत नसेल तर वेदनादायी गोष्ट दुसरी नसेल. यानंतर मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने दैदिप्यमान विजय मिळवला. लोकसभा निवडणूक निकाल ते महाराष्ट्र विधानसभा निकाल या मधल्या कालखंडात संघाने ज्या जाहीर कानपिचक्या दिल्या की कुणी स्वतःला देव समजू नये, स्वतःच्या हिंमतीवर सगळं करु शकतो असं समजू नये. यामध्ये कुणाचं नाव घेतलं गेलं नसलं तरीही ते स्वच्छ दिसलं भाजपाच्या अनुषंगाने नाव न घेता का बोललं गेलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेताही ही भेट महत्त्वाची ठरते असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणाबाबत काय म्हणाले गिरीश कुबेर?
दुसरा मुद्दा राज ठाकरेंच्या भाषणाचा. राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्याची सुरुवात निधर्मीवाल्यांना आवडेल अशी केली शेवटी मात्र देवेंद्र फडणवीस यांना अटी-शर्थींवर पाठिंबा देईन अशा स्वरुपाची मांडणी केली. राज ठाकरेंच्या वैचारिक झोक्याचा इशारा मिळतो का? ही चर्चा सुरु आहे. २०१९ नंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत राज ठाकरे मराठी हिंदू नायक गणले जाऊ लागले होते. भगवी शाल, उपरणं घेऊन त्यांनी भाषणं केली होती. गुढी पाडव्याच्या भाषणात भगवं काहीही नव्हतं. ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी पाडव्याचं भाषण केलं ते खरे राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंचा संवाद खऱ्या अर्थाने चांगला कधी होतो जेव्हा ते त्यांच्या वैयक्तिक मतांच्या खरेपणाच्या अनुषंगाने भूमिका घेतात. मग औरंगजेब प्रकरणाची असो, कुंभमेळ्याची असो, राज ठाकरेंनी वैयक्तिक भूमिकेचा विचार करुनच ती भूमिका मांडली नदी प्रदूषणाबाबतचं त्यांचं भाष्य, चित्रपटामुळे शिवप्रेम जागं झाल्यारखं वाटणं हे राज ठाकरेंच्या भाषणात दिसलं. आता पुढची त्यांची भूमिका उद्धव ठाकरेंचं नाक कापणं हाच एक कलमी कार्यक्रम असणार आहे असं दिसतं आहे. मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुका झाल्या तर या निवडणुका ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाच्या आहेत. मराठीसाठी दावा करणारे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन उपकृत केलं हे सांगणारा भाजपा आहे, तर राज ठाकरे यांचाही पक्ष आहे. राज ठाकरे सांधा बदलतात आहेत का असा प्रश्न गुढीपाडवा सभेमुळे निर्माण झाला असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.