PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना पुष्पांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत देखील होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्मृती मंदिराच्या अभ्यागत पुस्तिकेत एक संदेश लिहिला आणि त्यावर स्वाक्षरीही केली. यानंतर, पंतप्रधान मोदी नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीलाही भेट दिली.

नागपूरमधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन केले. ही इमारत २०१४ मध्ये स्थापन झालेल्या नागपूरमधील एक प्रमुख नेत्ररोग सेवेचा विस्तार आहे. ही संस्था आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम एस गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आली होती. या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित आहे, ज्यामध्ये १४ बाह्यरुग्ण विभाग आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “विकसित भारतासाठी देश ज्यामध्ये अडकला होता, त्या बेड्या तोडण्याची गरज होती. आज आपण पाहत आहात की, देश गुलामीची मानसिकता मागे टाकून प्रगती करत आहे. गुलामीच्या विचारांनी निर्माण करण्यात आलेल्या कायद्यांची आता भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे. आपल्या लोकशाहीच्या अंगणाता आता राजपथ नाही कर्तव्यपथ आहे.”

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या नौदलाच्या ध्वजातही गुलामीचे चिन्ह होते. त्याजागी आता नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे.”

स्मृती मंदिराच्या अभ्यागत पुस्तकात पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “परमपूज्य डॉ. हेडगेवार आणि पूज्य गुरुजींना वंदन. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी या स्मारक मंदिरात येऊन मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनेच्या मूल्यांना समर्पित हे स्थान आपल्याला राष्ट्रीय सेवेत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या दोन मजबूत स्तंभांचे हे स्थान देशाच्या सेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत आहे.”

नागपूरातील दीक्षाभूमीवर दाखल झाल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी तिथल्या अभ्यागत पुस्तकात लिहिले की, “बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांपैकी एक असलेल्या नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाल्याने मी भारावून गेलो आहे. या पवित्र स्थळाच्या वातावरणात बाबासाहेबांचे सामाजिक सौहार्द, समता आणि न्यायाचे तत्व अनुभवता येते. दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंना समान हक्क आणि न्याय देणारी व्यवस्था घेऊन पुढे जाण्याची ऊर्जा देते.”