यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी, २८ फेब्रुवारीला यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.
४७ एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात दुपारी ४ वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. ते विमानाने नागपूर येथे आणि तेथून हेलिकॉप्टरने यवतमाळमध्ये येणार असल्याचे कळते. महिला मेळाव्यासह पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतिस्थळाचे लोकार्पण, वर्धा-कळंब रेल्वेचे लोकार्पण आदी महत्त्वाचे कार्यक्रमही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा >>> अवकाळी, गारपिटीमुळे पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान
नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी पात्र असून, दोन्ही योजनेचे सुमारे १९४३.४६ कोटी रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी यवतमाळ येथील कार्यक्रमात वितरीत होणार आहे.