गेल्या एक महिन्याच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर दुसरी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना क्रेन पडली आहे. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरून मजुरांवर कोसळला. सुरक्षेबाबत कोणतीही उपययोजना नसल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशन दल आणि एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, “महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबाबरोबर माझ्या सहवेदना आहेत. तर, जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.”
“मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.