मागील महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा मुंबई दौरा केला आहे. यात मोदींनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. तसेच मुंबईकरांना साद घालत नुकताच जाहीर झालेला अर्थसंकल्प कसा गरिब आणि मध्यमवर्गीयांना फायदा पोहचवणारा आहे, हे सांगितलं. ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) मुंबईत बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. याबाबत मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे. यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं.”
“आज मध्यमवर्गीयांच्या ज्या उत्पन्नावर शून्य कर, त्यावर यूपीए सरकार २० टक्के कर”
“२०१४ च्या आधी काय परिस्थिती होती तुम्ही पाहा. जे लोक २ लाखापेक्षा जास्त कमावत होते त्यांनाही कर भरावा लागत होता. भाजपा सरकारने आधी ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं. आता या अर्थसंकल्पात ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आज मध्यमवर्गीयांच्या ज्या उत्पन्नावर शून्य कर आहे, त्यावर यूपीए सरकार २० टक्के कर आकारत होतं,” असं म्हणत मोदींनी यूपीए सरकारला लक्ष्य केलं.
“आमचं सरकार गरिब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारं”
“ज्यांना आत्ताच नोकरी लागली आहे, महिन्याचं उत्पन्न ६०-६५ हजार रुपयांचं आहे त्यांना आता जास्त गुंतवणूक करता येणार आहे. गरिब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारं आमचं सरकार असेच निर्णय घेते. ‘सबका विकास’ करणारा हा अर्थसंकल्प प्रत्येक कुटुंबाला बळ देईल. मी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं अर्थसंकल्पातील तरतूद आणि इतर गोष्टींसाठी अभिनंदन करतो,” असंही मोदींनी नमूद केलं.