PM Narendra Modi : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. काही दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी नेत्यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ठाण्यात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडीने विकासकामे रोखण्याचा प्रयत्न केला, पण आता विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचं काम करा”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठीचा सन्मान नाही तर मराठी साहित्य कला आणि संस्कृतीचा देखील सन्मान आहे. मी देशातील सर्व मराठी बोलणाऱ्यांना शुभेच्छा देतो. ठाण्यात येण्याच्या आधी मी वाशिममध्ये होतो. त्या ठिकाणी नऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी जारी करण्याचा योग मला प्राप्त झाला. आजच्या दिवसाची अनेक लोक वाट पाहत होते”, असं मोदी म्हणाले.
“आम्हाला विकास कारायचा आहे आणि याआधी काँग्रेसने केलेल्या खड्यांनाही भरायचं आहे. विकसित भारत हे एनडीए सरकारचं लक्ष्य आहे. असे अनेक काम आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आमच्या सरकारने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम केलं आहे. असे अनेक प्रकल्प आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आता ते जर मोजायला गेलो तर दिवस कमी पडेल”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीला संधी मिळाली की ते विकासाचे काम थांबवण्याचे काम करतात. मुंबई मेट्रो हे देखील त्याचच एक उदाहरण आहे. महाविकास आघाडीला फक्त विकास थांबवण्याचं काम येतं. मात्र, विकासकाम थांबवणाऱ्यांना आता सत्तेपासून लांब ठेवा. महाविकास आघाडी जोपर्यंत सत्तेत होती, तोपर्यंत अनेक प्रकल्पाचं काम थांबवलं. अडीच वर्ष काम थांबवल्यामुळे मेट्रोचा खर्च १४ हजार कोटींनी वाढला. मग हे पैसे कोणाचे होते? सर्व सामान्य नागरिकांनी भरलेला टॅक्सचे होते”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला.