भाजपात काही चांगली माणसं आहेत. सर्व भ्रष्टाचारी तुमच्या आजुबाजूला बसल्यावर त्या मेळ्यात कसं काय बसू शकता. दुसऱ्यांच्या कुटुंबावर बेफाम आरोप करत चारित्र्यहनन करायचं. पण, यांच्या नेत्यांवर आरोप केलं, की भारताचा अपमान. तुमचा नेता म्हणजे भारत नाही. एवढा क्षुद्र भारत नाही. मोदींवर टीका केल्यावर भारताचा अपमान कसा?, असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यांच्यासाठी आपल्या क्रांतीकारकांनी बलिदान दिलं? रक्त सांडलं? फासावर गेले? माझा देश मोठा आहे. तुमच्या कुटुंबावर बोलल्यावर तातडीने पोलीस कारवाई करतात. घराघरात पोलीस घुसतात. माणूस परराज्यात गेला, तर तिकडून आणतात. जसं तुमचं कुटुंब तुम्हाला प्रिय आहे. तसं, प्रत्येकाचं कुटुंब आपआपल्याला प्रिय आहे.”
हेही वाचा : “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा
“जर आमच्या कुटुंबाच्या बदमानीचा प्रयत्न थांबवला नाही. तर, तुमच्या कुटुंबाची लागी-बांधी आम्हाला चव्हाट्यावर काढावी लागतील. पण, अद्याप आम्ही काढत नाही. आमचं हिंदूत्व आहे. आमच्यावर संस्कार आहे. महिला आणि मुलीवर आरोप करत नाही,” असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
हेही वाचा : “५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी…”, उद्धव ठाकरेंचं चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकास्र!
“नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं… पण ही जिवाभावाची माणसं चोरू शकणार नाही. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते, मात्र हे प्रेम कायम राहते. हे प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही. कांद्याला भाव मिळाला नाही, असं तुम्ही म्हणतात. मी म्हणतो कांदा खरेदी झाली. एका कांदा ५० खोक्याला विकला गेला,” असा टोला उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेना लगावला आहे.