पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं असून डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग तसंच इतर विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी जाहीर कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. विकासकामांचं उद्धाटन करताना आपल्या आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
“आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं वंदन,” अशी मराठीत मोदींनी सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारका उदयाला येत आहेत असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. हे महानक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा, ऊर्जा देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“पायाभूत सुविधांना एक मानवी स्पर्श देणारं सरकार सध्या देशात आहे. प्रत्येक गरीबाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणार आय़ुषमान भारत योजना सामाजिक पायाभूत सुविधेचं उदाहरण आहे. उज्जैनपासून ते पंढरपूर्यंत आपल्या प्रार्थनास्थळांचा विकास आपल्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांचं उदाहरण आहे. ४५ कोटींपेक्षा जास्त गरिबांना बँकिंग प्रणालीशी जोडणारी जनधन योजना आपल्या आर्थिक पायाभूत सुविधेचं उदाहरण आहे,” असं मोदींनी सांगितलं. पायाभूत सुविधांना फक्त निर्जीव रस्ते आणि फ्लायओव्हरपुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. याचा विस्तार फार मोठा आहे असंही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींनी यावेळी गोसेखूर्द प्रकल्पाचं उहाहरण दिलं. “३०-३५ वर्षांपूर्वी या धरणाचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यावेळी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण विलंबामुळे गोसेखूर्द प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४०० कोटींहून १८ हजार कोटींवर गेला. २०१७ मध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर या धरणाचं काम वेगाने सुरु आहे. सर्व समस्या सोडवण्यात आल्या आहेत. या वर्षी हे धरण पूर्ण भरलं याचा आनंद आहे. यासाठी तीन दशकांहून अधिकचा काळ लागला. त्यानंतर शेतकरी, गावांना याचा लाभ मिळत आहे,” असं मोदी म्हणाले.
“आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास’ यावर जोर देत आहोत. मी जेव्हा सबका प्रयास म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक नागरिक आणि राज्य सहभागी आहे. छोटे, मोठे सर्वांचा सामर्थ्य वाढेल, तेव्हाच भारताचा विकास होईल. यामुळे वंचित राहिलेल्यांना, ज्यांना छोटं समजण्यात आलं त्यांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत,” असं मोदींनी सांगितलं.
“मी महाराष्ट्र, देशातील लोकांना देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून सावधान करु इच्छित आहे. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्ट कट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासनं देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचं निर्माण करु शकत नाहीत,” अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.
पुढे ते म्हणाले की “भारत पुढील २५ वर्षांचं धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. दुसऱ्या आण तिसऱ्या वेळीही आपण मागे होतो. पण आज देशात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, तेव्हा भारत ती संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे”.
नरेंद्र मोदींनी यावेळी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरचं उदाहरण दिलं. या देशांमध्येही करदात्यांचे पैसे लुटले असते तर हे देश आहेत त्या उंचीवर पोहोचू शकले नसते असं मोदींनी सांगितलं. भारताकडे उशिरा का होईना ही संधी आली आहे असंही ते म्हणाले.
“आपल्या देशातील करदात्यांनी दिलेला पैसा भ्रष्टाचारासाठी किंवा मतांसाठी वापरण्यात आला. पण आता सरकारी तिजोरीतील पैशांचा उपयोग तरुण पिढीच्या उज्वल भविष्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. मी देशातील सर्व तरुणांना, करदात्यांना अशा स्वार्थी राजकीय पक्ष, नेत्यांना उघडं पाडा असं आवाहन करतो. ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ असं धोरण अवलंबणारे, देशाला आतून पोकळ बनवतील,” अशी भीती मोदींनी व्यक्त केली.
“गुजरातमधील निकाल स्थायी विकास, आर्थिक निती आणि विकासाच्या धोरणाचा परिणाम आहे. मी शॉर्टकट मारणाऱ्या राजकीय नेत्यांनाही स्थायी विकासाचं धोरण, महत्व समजून घेण्याचं आवाहन करतो. शॉर्टकट न मारता, स्थायी विकासाच्या माध्यमातूनही तुम्ही वारंवार निवडणूक जिंकू शकता. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही असं मला त्यांना सांगायचं आहे. देशाच्या हिताला प्राथमिकता दिल्यानंतर शॉर्टकटच्या राजकारणाचाही त्याग कराल,” असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिला.