पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. सोलापुरात असलेल्या कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना चाव्या हस्तांतरीत केल्या. यावेळी विविध विकासकामांचेही मोदींनी लोकार्पण केलं आहे.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते.
कामगारांचं शहर अशी सोलापुरची ओळख आहे. याआधी सूतगिरण्यांमध्ये राबणारे कामगार आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत काम करतात. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळण्यासाठी रे नगरमध्ये गृहप्रकल्प साकारला गेला. कामगारांची देशातील ही सर्वात मोठी वसाहत आहे.
कसा आहे प्रकल्प?
सोलापुरातील कुंभारी रे नगरमध्ये ही वसाहत ३५० एकरवर पसरली आहे. या प्रकल्पात ८३४ इमारती आहेत. त्यात ३० हजार सदनिका आहेत. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे. पंतप्रधान मोदींनी ९ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. आता पाच वर्षांनी मोदींच्याच हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण झालं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरं उभारण्यात आली आहेत. १० हजार कामगारांनी हा प्रकल्प साकारला आहे. सर्व मूलभूत सोयी सुविधा या प्रकल्पात आहेत.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“प्रभू श्री राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. तर, सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला नवीन घरात गृहप्रवेश केल्यावर रामज्योती प्रज्ज्वलित करावीत. सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव मला आहे. तुम्हाला घर मिळत आहे, ते पाहून मला असं वाटतं की, कदाचित मलाही लहाणपणी अशा घरात राहायला मिळालं हवं होतं,” असं म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले.
मलनिस्सारण प्रकल्पाचं भूमिपूजन अन् पीएमस्वनिधी वितरण
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव आणि भद्रावती या शहरांत हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा; तर सांगली शहरातील मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन केलं आहे. एक हजार २०१ कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा; तसेच मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आलं. करोना प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत सोलापुरातील १० हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात येईल.