ठाणे ते दिवा या मध्य रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळाला असला, तरी यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीए सरकारच्या काळातल्या काही चुकांमुळे आणि ढिलाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचा दावा केला आहे. तसेच, २०१४पूर्वी पायाभूत सोयी-सुविधांच्या क्षेत्रात उदासीन दृष्टीकोन ठेवण्यात आला होता, असं देखील मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ठाणे-दिवा ही नवी मार्गिका मुंबईकरांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. ही नवी रेल्वेलाईन मुंबईच्या कधीही न थांबणाऱ्या आयुष्याला अधिक वेग देईल”, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

२०१५मध्ये प्रकल्प का पूर्ण झाला नाही?

“२००८मध्ये या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं. २०१५मध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हायचा होता. मात्र २०१४पर्यंत हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहिला होता. त्यानंतर आम्ही या कामाला वेग दिला. अनेक आव्हानं असूनही आपल्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. राष्ट्र निर्माणासाठी अशा बांधिलकीचं मी मनापासून अभिनंदन करतो”, अशा शब्दांत मोदींनी यूपीए सरकारवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

“७-८ वर्षांपूर्वीपर्यंत रेल्वे कोच कारखान्यांच्या बाबतीत उदासीन दृष्टीकोन होता. पण आज वंदे भारत रेल्वे आमि स्वदेशी विस्टाडोम कोच याच कारखान्यांमध्ये बनत आहेत”, असं देखील मोदी म्हणाले.

यूपीए सरकारच्या कारभारावर निशाणा

“रेल्वेमधील सुधारणा दळण-वळणात क्रांतीकारी बदल आणू शकते. त्यामुळे गेल्या ७ वर्षांत केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देत आहे. पूर्वीच्या काळात पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्प वर्षानुवर्ष सुरू राहायचे. कारण नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत कोणताही ताळमेळ नव्हता. आम्ही पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टरप्लॅन तयार केला आहे”, असं मोदी म्हणाले.

“आजपासून मध्य रेल्वे लाईनवर ३६ रेल्वे सुरू होत आहेत. यात बहुतांश एसी ट्रेन आहेत. गेल्या ७ वर्षांत मुंबईत मेट्रोचा देखील विस्तार केला गेला आहे. मुंबई उपनगरांमध्ये देखील मेट्रोचं जाळं विस्तारलं जात आहे. मुंबईनं स्वतंत्र भारताच्या प्रगतीत आपलं योगदान दिलं आहे. आता आत्मनिर्भर भारतामध्येही मुंबईचं सामर्थ्य अनेक पटींनी वाढावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, असं मोदींनी यावेळी सांगितलं.