वाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैशिक नेतृत्व आहे देशात आणि परदेशात आपला दबाव गट तयार करण्याचे काम मोदींनी केले आहे. सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याची ताकद फक्त मोदींमध्ये आहे. मोदींना सारख्या जागतिक नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधात सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे, या नेत्याची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
महायुतीचे सातारातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा झाली. यावेळी डॉ. गिरीश महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार देवयानी फरांदे, महादेव जानकर, राष्ट्रवादीचे अमित कदम, आरपीआयचे अशोक गायकवाड, माजी आमदार मदन भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-“पटलं नाही तर नव्याने निर्माण करा, आहे ते ओरबाडू नका”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमका रोख कुणाकडे?
लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून फसवणारे शरद पवार कोल्हापुरात शाहू महाराजांना बिनविरोध करण्याची भाषा करतात. नेत्याने साताऱ्यात दुटप्पीपणा दाखवला आहे. या नेत्याने शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधात सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे, या नेत्याची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
सत्ता होती, तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडलेल्या नेत्याने मोदींना ऊसातलं काय कळतं अशी टिंगल केली होती. त्याच मोदींनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर असलेला इन्कम टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांची सुटका केली. मोदींना समजलं ते तुम्हाला समजलं नाही. जनतेच्या मनातील स्पंदन, रुदन हे मोदींना थेट समजते,असे ते म्हणाले.
मागच्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी कायदे बदलले साखर कारखाने कारखान्यांना ताकद दिली. भारताला आधुनिक बनवण्याचे काम केले. अशावेळी मोदींचे दोन विरोधक ध्रुव आहेत. एक राहुल गांधी आणि शरद पवार त्यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. शरद पवार पंतप्रधान होऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरेंनी प्रश्न सुटत नाहीत. महायुतीची गाडी ही सर्वसामान्यांची सभा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी गाडी आहे. त्या विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन आहे, डबे नाहीत. राहुल गांधींच्या इंजिनात फक्त सोनिया आणि प्रियांकांचा जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनात सुप्रिया सुळे शिवाय कोणी नाही. आणि उद्धव ठाकरेंच्या डब्यात इंजिनात आदित्य शिवाय कोणाला जागा नाही. ते तुम्हाला कुठेही जागा देऊ शकत नाहीत आणि तुमचा विकास करू शकत नाहीत.
उदयनराजे म्हणाले, देशाला तांत्रिकदृष्ट्या मागास ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. महायुतीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल दहा हजार कोटींची कामे झाली. आता टुरिझम, आयटी पार्क, कृष्णा नदीचे शुद्धीकरण, एमआयडीसीची निर्मिती, स्ट्रॉबेरी, हळद, बटाटा संशोधन केंद्र, अग्रो प्रोसेसिंग युनिट्स उभारण्याच्या अनुषंगाने आम्ही पाऊले टाकत आहोत. आम्हाला केंद्र व राज्य सरकारचे निश्चितपणाने बळ मिळणार आहे. यावेळी शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, महादेव जानकर आदींची भाषणे झाली यावेळी उदयनराजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले सभेला मोठी गर्दी होती.