सुजित तांबडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती : बारामतीतील नवीन प्रचारफलकांवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी; तसेच महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे गायब झाल्याचे दिसते आहे. फलकांवर फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे एकत्र छायाचित्र आणि ‘राष्ट्रवादी’चे घडयाळ चिन्ह असलेले फलक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केल्यानंतर त्याचे पडसाद बारामती शहर आणि परिसरात उमटल्याचे दिसत असून, त्याचमुळे फलक बदलले असल्याची बारामतीत चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात रेसकोर्स येथे झालेल्या जाहीर सभेत पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांच्याबाबत ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. बारामतीच्या प्रचारामध्ये आतापर्यंत शरद पवार आणि अजित पवार कुटुंबीयांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी करण्यावर भर देण्यात आला होता. बारामतीकरांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी आदर आणि सहानुभूती, तर अजित पवार यांच्या विकासकामांमुळे त्यांच्याविषयीही पाठिंब्याची भावना आहे. त्यामुळे कोणाची बाजू घ्यायची, या संभ्रमात बारामतीकर पडले आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या टिप्पणीवर बारामतीकरांमध्ये भाजपबाबत संताप आहे.

स्थानिकांमधील या संतापाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) फलक बदलल्याची चर्चा आहे. आधीच्या फलकांवर पंतप्रधान मोदी आणि भाजपबरोबरच महायुतीतील मित्रपक्षांतील नेत्यांची छायाचित्रे होती. मात्र, मोदी यांच्या वक्तव्यानंतर उमटलेली तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन अजित पवार गटाकडून ठिकठिकाणी लावलेले प्रचारफलक काढून नवे लावले आहेत. त्यातून पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर मित्रपक्षांच्या नेत्यांची छबी काढून टाकण्यात आली आहे. नवीन प्रचारफलकांवर अजित पवार-सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घडयाळ हे चिन्ह एवढेच ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जमिनींमध्ये दलाली हेच मविआ सरकारचे उद्योग; कणकवलीतील सभेत राज ठाकरे यांचा आरोप

अजित पवारांनी केलेल्या विकासकामांमुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. मात्र, शरद पवार यांच्याविषयी आमच्या मनात कायम आदराची भावना आहे. त्यांच्याविषयी पंतप्रधान मोदी यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही.

– संतोष जाधव, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

बारामतीचा कायापालट करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्यांचे राजकारण संपविण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, तो कधीही यशस्वी होणार नाही.

– सतीश सावंत, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्ष 

शरद पवार आणि अजित पवार या दोघांविषयी आम्हाला आदर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांपैकी कोणाला मत द्यायचे, असा प्रश्न आमच्यापुढे पडला आहे. – दिनेश खरात, मतदार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi photo disappeared from ncp election sign board in baramati zws
Show comments