पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान, त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हजर राहणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे.

शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे, मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून पुण्यात मोदींविरोधात आंदोलन करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहणारच असतील तर त्यांनी या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींची कानउघडणी करावी. पंतप्रधान जे काही करत आहेत, ते लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, हे शरद पवारांनी त्यांना सांगावं, अशी विनंती अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही विनंती केली.

हेही वाचा- पुणे: लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार

संबंधित व्हिडीओत अतुल लोंढे म्हणाले, “ज्या व्यक्तीमुळे (नरेंद्र मोदी) या देशाचं संविधान, लोकशाही आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना धोका पोहोचला आहे. अशा व्यक्तीच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थित न राहिलेलं बरं. ते उपस्थित राहिलेच तर त्यांनी पंतप्रधान मोदींची कानउघडणी करावी. कारण याआधी पुण्यात नरेंद्र मोदींनी स्वत: शरद पवारांना गुरू म्हटलं होतं. मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे शरद पवारांनी उद्या पुण्यात आपल्या शिष्याचा (नरेंद्र मोदी) कान पकडून तुम्ही जे करत आहात ते लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, अशा पद्धतीची कानउघडणी करावी, अशी आमची विनंती आहे.”

Story img Loader