Sharad Pawar Speech in Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिलाच दिवस उद्घाटनपर भाषणांमुळे गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केलेल्या भाषणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. संमेलन उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबद्दल दाखवलेलं सौहार्द पाहून राजकीय आखाड्यातील या दोन दिग्गज नेत्यांमधलं वितुष्ट काही क्षणांसाठी का होईना, उपस्थित समुदाय विसरून गेला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. त्यानंतर शरद पवारांनीही कोणतेही आढेवेढे न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करतानाच त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले असता घडलेला प्रसंग सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी आपल्या स्वागतपर भाषणात जमलेल्या दर्दी साहित्यप्रेमींप्रमाणेच उपस्थित असलेल्या राजकीय नेतेमंडळींचंही स्वागत केलं. “नेहमी साहित्य संमेलन म्हटलं की त्यातील राजकीय मुद्द्यांवर लिखाण केलं जातं, पण यावेळी अजूनपर्यंत असं कुणी काही लिहिलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांनी त्यावर दाद दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!

दरम्यान, ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. “साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होतंय. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या सारस्वतांच्या महामेळ्याला उपस्थित राहिले याचा मला मनापासून आनंद आहे”, असं ते म्हणाले.

इथे पाहा उद्घाटन कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीओ!

यावेळी शरद पवारांनी मोदींना आमंत्रण देण्यासाठी गेले असता घडलेला प्रसंग उपस्थितांना सांगितला. “दिल्लीतल्या याआधी झालेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झालं. त्याचीच पुनरावृत्ती होताना आज ७० वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय याचा मला आनंद होतोय. मी त्यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांनी ते स्वीकारण्यासाठी एक मिनीटही लावला नाही. या कार्यक्रमाला माझी उपस्थिती आहे असं त्यांनी सांगितलं”, असं शरद पवारांनी नमूद केलं.

मराठी भाषेला अभिजात दर्जा

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यातील योगदानाबद्दलही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली, त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीने मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो”, असं ते म्हणाले.

…आणि शरद पवारांना खुर्ची देण्यासाठी मोदी सरसावले!

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार व्यासपीठावर आले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कृतीला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. शरद पवार त्यांच्या नावाच्या खुर्चीजवळ आले असता मोदींनी जागेवरून उठून शरद पवारांची खुर्ची त्यांना बसण्यासाठी पुढे केली. शरद पवार बसल्यानंतर ग्लासमध्ये पाणी भरून तो ग्लास शरद पवारांना देऊ केला. त्यांच्या या सौहार्दपूर्ण कृतीनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राजकीय विश्वात एकमेकांवर टीका करणाऱ्या दोन दिग्गजांचं राजकीय सौहार्द यानिमित्ताने मराठी साहित्यप्रेमींना दिल्लीत अनुभवायला मिळालं!