अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. २६ ऑक्टोबरच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपमध्ये दक्षिण-उत्तर असा वाद निर्माण झाला आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून पंतप्रधानांसह भाजपच्या बहुतांशी वरिष्ठ नेत्यांचे जिल्ह्याच्या उत्तर भागात, विखे यांच्या मतदारसंघात दौरे-कार्यक्रम होत आहेत. दक्षिण भाग त्यापासून वंचित राहत आहे, असा आक्षेप पक्षातीलच नेते, आजी-माजी आमदार घेऊ लागले आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी नगरमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यातही त्याचे पडसाद उमटले. त्याची दखल घेत अखेर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर शहरात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल तसेच पंतप्रधानांनाही निमंत्रित केले जाईल असे जाहीर केले. या वादाला दोन दिवसापूर्वीच माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी तोंड फोडले.
हेही वाचा : “आता अनेकांची तोंडं बंद होणार आणि…”; ललित पाटीलच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नगर शहरातील ‘महसूल भवन’ इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी मंत्री विखे यांच्या प्रयत्नातून पक्षाचे मोठे नेते शिर्डीतच येत आहेत, आता आम्हाला दक्षिण भागात एखादे साई मंदिर उभे करावे लागेल, तेव्हा कोठे दक्षिण भागात दौरे होतील, असे सांगत तोंड फोडले होते. त्यानंतर आज पंतप्रधान दौऱ्याच्या नियोजनासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी पंतप्रधान, त्याआधी केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, शासन आपल्या दारी असे सारे कार्यक्रम जिल्ह्याच्या उत्तर भागातच आयोजित केले जात आहेत. दक्षिणेतही एखादा कार्यक्रम घ्या, असा टोला महसूल मंत्री विखे यांना लगावला.
त्यावर स्पष्टीकरण देताना महसूल मंत्री विखे म्हणाले की, उत्तरेत साईबाबांचे अधिष्ठान आहे, त्यामुळे वरिष्ठ नेते तेथे येतात. परंतु असे असले तरी पुढचा कार्यक्रम नगर शहरात आयोजित केला जाईल, जिल्हा बँकेच्या कार्यक्रमानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निमंत्रित केले जाईल. त्यानंतर पंतप्रधानांनाही निमंत्रण देऊ.
हेही वाचा : “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर …
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनीही अशीच भावना व्यक्त करत जिल्ह्याच्या दक्षिण भागात पक्षाचे तीन आमदार, खासदार आहेत परंतु या भागात पक्षाचे मोठे कार्यक्रम नेत्यांचे दौरे आयोजित केले जात नाहीत, यासाठी आम्हाला शिर्डीसारखे एखाद्या देवस्थान दक्षिण भागात उभारवे लागेल. जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनीही आमदार शिंदे व आमदार राजळे यांची भावना बरोबर आहे. देशाचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी नेते येत असली तरी पक्षाच्या नेत्यांचे दौरे दक्षिण भागातही आयोजित केले जावेत, अशा अपेक्षा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डीमध्ये आले होते. त्यानंतर सन २०२० मध्ये पुन्हा त्यांचा शिर्डी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र तो कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे रद्द करण्यात आला. मात्र त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ शिर्डीमध्ये त्यानिमीत्ताने मंत्री विखे यांच्या मतदारसंघात येऊन गेले. राज्य सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रमही शिर्डीत आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा : धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला : गोपीचंद पडळकर…
उच्चांकी गर्दीचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमासाठी उच्चांकी गर्दी जमवली जाणार आहे. यासाठी किमान १ ते १.५ लाख नागरिकांची उपस्थिती असेल, असे मंत्री विखे यांनी सांगितले. ही गर्दी जमवण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था ही भाजपकडून करण्यात आली आहे. जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपवली गेली आहे. विविध योजनांच्या ३५ ते ४० हजार लाभार्थ्यांना या वाहनातून शिर्डीत आणले जाणार आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे तसेच त्यांना परत सोडले जाणार आहे.