कल्याण/नाशिक : हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा विचार करून त्यामधील अधिकचा वाटा मुस्लिमांना देण्याची खेळी करणाऱ्या काँग्रेसने आता अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांच्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा डाव आखला आहे. त्यासाठी ते ‘व्होट जिहाद’ घडवू पाहात आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कल्याण येथील महायुतीच्या प्रचारसभेत केला. काँग्रेसच्या ‘व्होट जिहाद’विरोधात बोलण्याची धमक राज्यातील विरोधी पक्षांतील एकाही नेत्यामध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि कल्याण येथे सभा घेतल्या. तसेच मुंबईत त्यांनी घाटकोपर परिसरात ‘रोड शो’द्वारे शक्तिप्रदर्शनही केले. नाशिक आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांमध्ये मोदींनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली.

काँग्रेसने आपल्या सत्ता काळात हिंदू-मुस्लिमांच्या मतांच्या तुष्टीकरणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची रचना केली होती. या अर्थसंकल्पातील १५ टक्के वाटा मुस्लिमांना देण्याचे नियोजन काँग्रेस सरकारने केले होते. हे मोठे पाप असल्याने आणि हा प्रकार देशामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा, विकासाच्या खाईत लोटणारा असल्याने आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या वेळी या निर्णयाला विरोध केला होता. आता काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर तीच खेळी करण्याचा प्रयत्न करेल असा आरोप मोदी यांनी केला.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्यांचा व्याजासह हिशोब चुकता करणार – खा. पाटील

आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांतील मतदानात जनतेने काँग्रेसला पार झिडकारले आहे. त्यामुळे काँग्रेससह त्यांच्या ‘शहजाद्यां’च्या पायाखालील जमीन सरकली आहे. हे शहजादे आता पुन्हा जुना खेळ बाहेर काढून देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग यांच्या आरक्षणावर डोळा ठेवून आहेत. या आरक्षणासाठी काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठी प्रयोगशाळा उघडली आहे. कर्नाटकमध्ये सत्तेत येताच काँग्रेसने रातोरात वटहुकूम काढून मुस्लिमांना एका रात्रीत इतर मागास प्रवर्गाचा दर्जा दिला. अशा प्रकारे इतर मागास जातींच्या आरक्षणाचे तुकडे तुकडे करून काँग्रेसवाले ते मुस्लिमांना येत्या काळात वाटू पाहत आहेत. आरक्षणाची लूट करून काँग्रेसवाले मतांच्या तुष्टीकरणासाठी व्होट जिहाद खेळत आहेत, असा घणाघात मोदींनी काँग्रेसवर केला.

कांद्याबाबत भाष्य

कांदाप्रश्न गाजत असलेल्या दिंडोरी मतदारसंघातील या सभेत पंतप्रधान मोदी यांना कांद्यावर बोलणे भाग पडले. मागील पाच वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के वाढ झाली. दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली झाल्यानंतर आतापर्यंत २२ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे मोदी यांनी सांगितले. कांद्याचा राखीव साठा करण्याचे काम आम्ही सुरू केले. गतवर्षी सरकारने सात लाख कांदा खरेदी केला होता. यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. कांदा निर्यातीसाठी वाहतुकीकरिता दिली जाणारी अनुदान योजना पुन्हा सुरू केली जाईल. नाशिकला द्राक्षांसाठी क्लस्टर योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

उद्धव, पवारांवर टीका

चार टप्प्यांतील मतदानात काँग्रेसचा दारुण पराभव होईल. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रातील एका नेत्याने किमान हे पद काँग्रेसकडे राखले जावे म्हणून लहान पक्षांना त्यात विलीन करण्याचे विधान केल्याचा टोला मोदी यांनी शरद पवार यांना हाणला. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेसकडून आक्षेपार्ह विधाने केली जात असताना नकली शिवसेनेने त्यांच्यासमोर गुडघे टेकले असल्याची टीका त्यांनी केली.

कांद्यावर बोलाम्हणून गोंधळ

मोदी यांचे भाषण सुरू असतानाच एका युवकाने मध्येच उभे राहून ‘कांद्यावर बोला’ अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. मोदी यांना भाषण थांबवावे लागले. भाजप कार्यकर्त्यांनी लगेच मोदी, मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी धाव घेत संबंधित युवकास ताब्यात घेतले. मात्र पोलीस बाहेर नेत असतानाही तो काही घोषणा देत होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जय श्रीराम, भारत माता की जय, अशा घोषणा उपस्थितांकडून वदवून घेत पुन्हा भाषण सुरू केले.

पहिल्या शंभर दिवसांत काय काम करायचे, याची ब्लूप्रिंट तयार केली आहे. देशातील युवकांकडे नवनवीन कल्पना आहेत. त्यांच्या कल्पनांचा समावेश करण्यासाठी शंभर दिवसांमध्ये आणखी २५ दिवसांची वाढ करणार आहे. यामुळे देशाचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल आणि २०४७ च्या आधीच विकसित भारतचा संकल्प पूर्ण होईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान व भाजप नेते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress over vote jihad allegations zws
Show comments