मालवण आणि तार्कर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इथलं वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करतं आहे. झुकू नका, थांबू नका पुढे चाला हा मंत्र नौदलाने दिला आहे. आज मी नौदलाच्या अधिकाऱ्यांना नौदल दिवसाच्या शुभेच्छा देतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहून आपला उर अभिमानाने भरुन येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं महत्व पटलं होतं. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो त्याला सत्ता राखता येते हे त्यांना माहीत होतं. हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे या वीरांनाही मी वंदन करतो. छत्रपती शिवजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून भारत देश प्रगती करतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
भारताचा इतिहास गौरवशाली आहे
मी स्वतःला भाग्यवान समजतो की नौदलाच्या झेंड्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेशी जोडण्याची संधी मला मिळाली. मला आज एक आणखी घोषणा करायची आहे, भारतीय नौदल आता रँक्सची नावं आपल्या परंपरेप्रमाणे देणार आहे. नारीशक्तीची संख्या वाढवण्यावरही आपण भर देत आहोत. नेव्हल शिपमध्ये पहिल्या महिला कमांडिंग अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. आजचा भारत हा आपल्यासाठी नवी लक्ष्यं ठरवतो आहे ही खूप चांगली बाब आहे. एक मोठी ताकद भारताच्या मागे आहे आणि ती ताकद १४० कोटी लोकांच्या विश्वासाची ताकद आहे. भारताचा इतिहास हा एक हजार वर्षांच्या गुलामीचा इतिहास नाही, फक्त हार आणि निराशा यांचा इतिहास नाही. भारताचा इतिहास विजय, शौर्य, ज्ञान आणि विज्ञान यांचा इतिहास आहे. आपल्या समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे. एक काळ असा होता की ज्या काळात सुरतच्या किनाऱ्यावर ८० हून जास्त देशांची जहाजं असायची.
विदेशांतून जेव्हा हल्ले झाले तेव्हा आपल्या शक्तींवर हल्ले केले गेले. आपली कला, कौशल्य विदेशी हल्ल्यांनी ठप्प केलं होतं. जेव्हा आपण समुद्रावरचं नियंत्रण घालवलं तेव्हा आर्थिकदृष्ट्याही आपण कमकुवत झालो. आता आपल्या देशाला गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. शिवरायांनी कमावलेली नौदलाची शक्ती आपण परकिय आक्रमणांमुळे गमावली, आता ती पुन्हा मिळवायची आहे असंही ते म्हणाले. नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.