चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त राहिल्याची माहिती जाणून घेतली

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्यासोबत आज शुक्रवारी सकाळी संवाद साधला. चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त राहिल्याबद्दल अभिनंदन करतानाच प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. दरम्यान, पंतप्रधानांचा असा अचानक फोन आल्याने मूल येथे फडणवीस वाडय़ावर सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

करोनाच्या टाळेबंदीत आज शुक्रवारी सकाळी मूल येथे फडणवीस वाडय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन खणखणला. फोन उचलल्यानंतर बोलायला सुरुवात केली तर समोरून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय आस्थेने शोभाताईंची चौकशी केली. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ताईंना तुम्ही कशा आहात, प्रकृती कशी आहे, अशी विचारणा केली. सध्या चंद्रपूर जिल्हय़ाचे देशात व राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला मुख्य कारण चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त आहे. तेव्हा कशा पद्धतीने चंद्रपूर करोनामुक्त राहिला याचीही माहिती प्रधानमंत्र्यांनी जाणून घेतली. चंद्रपूर जिल्हय़ात करोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने अतिशय उत्तम कार्य केल्याची माहिती श्रीमती फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिली. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याची माहिती श्रीमती फडणवीस यांनी  दिली.

नागपूर व यवतमाळपासून या दोन्ही जिल्हय़ात करोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येत मिळाल्यानंतरही चंद्रपूर करोनामुक्त राहिल्याबद्दल विशेष कौतुक पंतप्रधानांनी केल्याचे श्रीमती फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader