मी महाराष्ट्र, देशातील लोकांना देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून सावधान करु इच्छित आहे. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. नागपुरात समृद्धी महामार्ग तसंच इतर विकासकामांचं उद्धाटन केल्यानंतर आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“खोटी आश्वासनं देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचं निर्माण करु शकत नाहीत,” अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली. पुढे ते म्हणाले की “भारत पुढील २५ वर्षांचं धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. दुसऱ्या आण तिसऱ्या वेळीही आपण मागे होतो. पण आज देशात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, तेव्हा भारत ती संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे”.

“आज संकष्टी चतुर्थी आहे,” मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले “डबल-इंजिन सरकार…”

नरेंद्र मोदींनी यावेळी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरचं उदाहरण दिलं. या देशांमध्येही करदात्यांचे पैसे लुटले असते तर हे देश आहेत त्या उंचीवर पोहोचू शकले नसते असं मोदींनी सांगितलं. भारताकडे उशिरा का होईना ही संधी आली आहे असंही ते म्हणाले.

“आपल्या देशातील करदात्यांनी दिलेला पैसा भ्रष्टाचारासाठी किंवा मतांसाठी वापरण्यात आला. पण आता सरकारी तिजोरीतील पैशांचा उपयोग तरुण पिढीच्या उज्वल भविष्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. मी देशातील सर्व तरुणांना, करदात्यांना अशा स्वार्थी राजकीय पक्ष, नेत्यांना उघडं पाडा असं आवाहन करतो. ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ धोरण अवलंबणारे, देशाला आतून पोकळ बनवतील,” अशी भीती मोदींनी व्यक्त केली.

Samruddhi Mahamarg: “हा प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण मी…”, एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका?

“गुजरातमधील निकाल स्थायी विकास, आर्थिक निती आणि विकासाच्या धोरणाचा परिणाम आहे. मी शॉर्टकट मारणाऱ्या राजकीय नेत्यांनाही स्थायी विकासाचं धोरण, महत्व समजून घेण्याचं आवाहन करतो. शॉर्टकट न मारता, स्थायी विकासाच्या माध्यमातूनही तुम्ही वारंवार निवडणूक जिंकू शकता. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही असं मला त्यांना सांगायचं आहे. देशाच्या हिताला प्राथमिकता दिल्यानंतर शॉर्टकटच्या राजकारणाचाही त्याग कराल,” असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi targets opposition parties appeal people to reveal them samruddhi highway inauguration sgy