राहाता : उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे, तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येत आहेत. या जोडीने मोदींच्या उपस्थितीत येथे एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हजारोंच्या उपस्थितीत हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे या दौऱ्याचे आयोजक महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
शिर्डी येथील काकडी विमानतळाच्या जागेत होणाऱ्या या कार्यक्रमाची गेल्या आठ दिवसांपासून जोरदार तयारी झालेली आहे. मोदी यांच्या सभेला सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सभास्थळाचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी ‘गावबंदी’चे लोण; मराठवाडय़ातील ६०० पेक्षा जास्त गावांत पुढाऱ्यांना बंदी
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी करण्यात आली असून, आज सोमवारी त्यांनी पुन्हा सभास्थळी जाऊन या तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर श्रीसाई मंदिरात दर्शन घेऊन संस्थानाच्या वतीने उभारलेल्या दर्शन रांगेचे उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधानांसह सर्व उपस्थित मान्यवर निळवंडे येथे धरणाचे लोकार्पण करून जलपूजन करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचे दुपारी तीनला काकडी येथील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आगमन होईल. या वेळी नगर येथील आयुष रुग्णालयाचे उद्घाटन व महिला व बालरुग्णालयाचे भूमिपूजन दूरदृष्य प्रणालीतून करणार आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाच्या कामाची सुरुवातही मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘नमो किसान सन्मान योजने’चा प्रारंभ करण्यात येणार असून, या योजनेतील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
‘नमो शेतकरी’ योजनेसाठी १७२० कोटींची तरतूद
केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेला जोडून राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान शेतकरी योजनेसाठी १७२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, उद्या शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेंतर्गत अनुदानाच्या पहिल्या हप्तय़ाचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. वेगवेगळय़ा कारणाने केंद्राच्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतून व राज्याच्या नमो योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दोन महिने विशेष मोहीम राबविली होती. त्यामुळे नव्याने १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
गेली अनेक वर्षे उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाकरिता निळवंडे धरणाची निर्मिती व्हावी यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची आग्रही भूमिका होती. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावाही झाला. परंतु अनेक वर्षे तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले गेले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली. पाच हजार १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळाली. सर्वांच्या प्रयत्नाने आज हा प्रकल्प पूर्ण होत आहे. – राधाकृष्ण विखे, मंत्री महसूल तथा पालकमंत्री