कराड : काँग्रेसला मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि ते धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्नही करू शकणार नाहीत, असे ठणकावून सांगताना, भाजप संविधान बदलणार या विरोधकांच्या आरोपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार खंडन केले. सातारा लोकसभा मतदारसंघाचे ‘महायुती’चे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह महायुतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा…सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – शरद पवार
जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून आम्ही तिथे डॉ. बाबासाहेबांचे संविधान लागू केले आणि जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळला. पण, हे काँग्रेसने आजवर का केले नाही? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
देशाच्या स्वातंत्र्याला बराच कालावधी लोटला. पण, काँग्रेसने देशात गुलामगिरीची मानसिकता तशीच कायम ठेवली. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नौदलावर अवघ्या विश्वाचा विश्वास असताना भारताच्या नौदलाच्या ध्वजावर मात्र ब्रिटिशांचे चिन्ह तसेच होते. नौदलाच्या या ध्वजावर आम्ही शिवमुद्रा आणली. जम्मू काश्मीरमध्ये देशाचे संविधान लागू झाल्याने तेथील जनतेला खऱ्याअर्थाने त्यांचे न्याय, हक्क मिळाल्याचा विश्वास मोदी यांनी दिला.
हेही वाचा…काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली – मुख्यमंत्री शिंदे
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने इतर मागास प्रवर्गात मुस्लिमांना घुसवून एका रात्रीत मुस्लिमांना इतर मागास वर्गाचे आरक्षण लागू करीत या वर्गाच्या २७ टक्के आरक्षणावर डाका टाकला. मुस्लिमांचे लांगुलचालन केले. आता हीच पद्धत देशभर राबवून इतर मागास वर्गावर अन्याय करण्याचे काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
हेही वाचा…सांगली : तपमान ४१ वर, प्रचारासह दैनंदिन कामावर परिणाम
विरोधकांनी समाजमाध्यमांवर भाजप नेत्यांचे बनावट चलचित्र (व्हीडीओ) प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने सैनिकांना ‘वन रँक, वन पेन्शन’पासून वंचित ठेवले. परंतु, आमच्या सरकारने ही योजना लागू करताना, माजी सैनिकांना पेन्शनपोटी एक लाख कोटींहून अधिकची रक्कम देवून टाकली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.