हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसंच, हरियाणा जिंकलो आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, असं मोदी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्या वेळी जिंकून येणं ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी गँग लोकांना संभ्रमात टाकत आहे. काँग्रेसचे सर्व षडयंत्र उद्ध्वस्त झाले. दलितांमध्ये खोटं पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण दलित समाजाने त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटलं. त्यांना जाणीव झाली की काँग्रेस त्यांचं आरक्षण काढून त्यांच्या वोट बँकेत देऊ इच्छित आहे. हरियाणातील दलित समाजाने भाजपाला रेकॉर्ड समर्थन दिलं आहे. ओबीसीही भाजपाबरोबर आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”

“काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावलं, पण शेतकऱ्यांना माहिती आहे की त्यांच्या उत्पादनावर एमएसपी कोणी दिली? काँग्रेसने तरुणांना टार्गेट केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपावरच विश्वास ठेवला. काँग्रेसने सर्व प्रयत्न केले. काँग्रेस नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा यावर चालली आहे. काँग्रसेने सातत्याने सिद्ध केलंय की काँग्रेस बेजबाबदार पक्ष बनला आहे. देशात फूट पाडण्यासाठी ते नवनवे योजना आखत आहेत. समाजात फूट पाडण्याकरता ते फॉर्म्युला आणत असतात. काँग्रेसचा फॉर्म्युला स्वच्छ आहे की मुस्लिमांना भीती घाला, त्यांचं वोट बँकेत रुपांतर करा. काँग्रेसच्या एकाही नेत्याने म्हटलं नाही की मुस्लीमांमध्ये किती जाती असतात. मुस्लीम जातींची गोष्ट निघताच त्यांच्या तोंडावर कुलूप लागतं. पण हिंदूची गोष्ट निघते तेव्हा त्यांची चर्चा जातीवरूनच सुरू होते. काँग्रेसची नीती आहे. काँग्रेसला माहीत आहे की हिंदूत जितकी फूट होणार तेवढाच त्यांचा फायदा होणार. हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय”, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली.

…म्हणून महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेसला संपवलं पाहिजे

“काँग्रेस ही द्वेष पसरवणारी मोठी फॅक्टरी बनणार आहे, असं स्वातंत्र्यानंतरच अनेक नेत्यांना कळलं होतं. त्यामुळे काँग्रेसला संपवलं पाहिजे असं खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. काँग्रेस स्वतःहून संपली नाही. पण ते देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असंही मोदी म्हणाले.

“काँग्रेसच्या या प्रतयत्नांना महाराष्ट्रातील लोकांनी हरवलं पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांनी भाजपा महायुतीसाठी मतदान करायचं आहे. हरियाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे. गेल्या दहा वर्षांत आम्ही देशात विकास घडवण्याचा मोठा यज्ञ केला आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi was talking in various projects launching event in maharashtra and critisice congress over haryana election result 2024 sgk