उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. आमच्यावर बोलण्याआधी तुमचे जागावाटप निस्तरा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. “भाजपाबरोबरच्या दोन कचऱ्याच्या डंपरमुळे त्यांच्याहातून महाराष्ट्र निसटत आहे. त्यामुळे भाजपाचे लोक नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून निवडणूक लढविण्यास सांगत आहेत. जेणेकरून मोदी जर महाराष्ट्रातून लढले तर भाजपाला दोन-चार जागा मिळू शकतील. नितीन गडकरींचे तिकीट कापून, त्यांचा काटा काढून नागपूर किंवा पुण्यातून लढण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन ४० हून अधिक जागा जिंकत आहेत. म्हणून मोदींना महाराष्ट्रात आणून निवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
“मी फडणवीस यांना पुन्हा सांगतो, संत तुकाराम यांचे अभंग त्यांनी मनापासून वाचावेत. ‘ऐसा नरा, मोजुनी माराव्या पैजारा…’ हा अभंग बेईमान लोकांसाठी आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांचा राजीनामा, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
भाजपाचा कार्यकर्ता निवडणूक आयोगाचे काम करेल
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली आहे. “निवडणूक आयोग हा भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. राज्यपाल जसे भाजपाशी संबंधित असलेले निवडले जातात. तसेच भाजपाचे कोणतेतरी कार्यकर्ते निवडणूक आयोगावर नेमले जातील. निवडणूक आयोग तटस्थ आणि निष्पक्ष असतो, आयोगाने संविधानानुसार काम केले पाहीजे. मागच्या १० वर्षात निवडणूक आयोगाचेही खासगीकरण झालेले असून ती भाजपाची एक शाखा बनली आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीत भाजपाचे संचालक
टीएन शेषन यांच्या काळात असलेला निष्पक्ष निवडणूक आयोग राहिलेला नाही. ईव्हीएम बनिवणाऱ्या कंपनीमध्ये भाजपाचे लोक संचालक म्हणून काम करू शकतात. तर भाजपाचे दोन कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या रिकाम्या जागी काम करतील”, असेही संजय राऊत म्हणाले.
राजीनाम्यामागे मोदी-शाह यांचा काहीतरी डाव
संजय राऊत पुढे म्हणाले, “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले किंवा त्यांना घ्यायला लावले, ते असंवैधानिक होते. दहाव्या परिशिष्टाची मोडतोड आणि पक्षांतरी बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले असताना हाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला होता. निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागे मोदी-शाह यांचा काहीतरी डाव असेल. मुळात अरुण गोयल यांची नेमणूकच अनैतिक होती, त्यामुळे ते नैतिक कारणांसाठी राजीनामा देतील, यावर माझा विश्वास नाही. ज्यांनी त्यांना नेमले त्यांनीच बाजूला केले. आता त्यांच्या जागी आणखी उपयुक्त असलेली व्यक्ती नेमली जाईल.”
भाजपाच्या कचऱ्याचा डंपर गुजरातला पोहोचवू
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिले. “फडणवीस वैफल्यग्रस्त असून निराश झालेले व्यक्ती आहेत. भाजपाची निती चिखलात लोळण्याची आहे. आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुखाचा आनंद घेत होते. आज मात्र त्यांच्याबाजूला दोन डबकी आहेत, त्यात ते लोळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एक तुफान निर्माण केलं आहे. याची त्यांना भिती वाटते. ज्यांच्या कचऱ्याच्या डपंरमध्ये बसून भाजपाचा प्रवास सुरू आहे. मात्र महाराष्ट्र हे डम्पिंग ग्राऊंड हा सगळा कचरा या डपंरसह महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत, हे आज मी देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.