पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षकदिनी होणाऱ्या भाषणाची प्रचंड उत्सुकता असली तरी शाळेत हा कार्यक्रम कसा निर्वघ्निपणे पार पाडावा, असा प्रश्न अनेक शाळेतील मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पडला आहे. शिक्षण विभागातील बहुतांश स्थानिक अधिकारी याबाबत उदासीन असले तरी अनेक शाळांनी हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
सुमारे शंभर दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणेदोन तास ते देशभरातल्या सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहेत.
दुपारी ३ ते ४.४५ या कालावधीत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आली आहे. टी.व्ही., इंटरनेट किंवा अतिदुर्गम भागात अपवादात्मक परिस्थितीत रेडिओद्वारे भाषणाचे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमास इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसे आदेश जारी केले आहेत. ज्या शाळेत टी.व्ही. नाही, अशा शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीने टी.व्ही. उपलब्ध करून द्यावा, विद्युतपुरवठा खंडित झाला असेल तर जनरेटरची व्यवस्था करावी, शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांला हे भाषण ऐकता यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातल्या अनुदानित, विनाअनुदानित खासगी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यभरात एक लाख ४ हजार शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे भाषण ऐकवण्याची सक्ती करण्यात आल्याने काही शाळांचे मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. अनेक शाळांमध्ये टी.व्ही. संच नाही, काही शाळांमध्ये संगणक नाही, अनेक शाळांमध्ये वीजजोडणी नाही अशा पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांचे भाषण कसे ऐकवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. शासनाचे आदेश म्हणून काही मुख्याध्यापकांनी आपापल्या पातळीवर तयारी केली आहे.
एकीकडे काही शाळांमध्ये मुख्याध्यापक समस्यांनी ग्रासलेले असताना दुसरीकडे उत्साही व प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या मुख्याध्यापकांनी हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. देशाचा पंतप्रधान विद्यार्थ्यांशी पहिल्यांदाच थेट संपर्क साधणार, ही कल्पनाच आनंददायी आहे. त्यामुळे आम्ही सर्व अडचणींवर मात करून हा कार्यक्रम यशस्वी करणार असल्याचे नवा मोंढा परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव शेळके यांनी सांगितले. शिक्षकांमध्ये जशी उत्सुकता आहे, तशी विद्यार्थ्यांमध्येही आहे. माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रसंग पहिलाच आहे. त्यामुळे सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम उत्साहात साजरा करणार असल्याचे ते म्हणाले. टी.व्ही. संच नाही, मालकीचे मदान नाही; पण टी.व्ही. संच आणून पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक मंडप उभारणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांमधील मरगळ या उपक्रमामुळे दूर होईल. सर्व शाळातील मुख्याध्यापकांनी अडचणींवर मात करून हा उपक्रम साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा