आपली कविता विचारांच्या पलीकडे नेऊन आत्मभान देणारी असावी. जुन्या कविता अभ्यासून, इतरांच्या कविता वाचून त्यापासून स्फूर्ती, प्रेरणा घ्यावी. कवीचे शब्द असहाय्य होता कामा नयेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांनी केले. नाशिक रोड येथील चांडक-विटको महाविद्यालय आणि ‘फासा’ संघटना यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काव्यवाचन स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. इंदिरा आठवले, प्रा. गितेश शिंदे, मनीष तपासे आदी उपस्थित होते. प्रथम पारितोषिक कोळपेवाडी येथील सुशीलाबाई काळे महाविद्यालयातील सागर मोरेने पटकाविले, तर द्वितीय पारितोषिक नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयातील चैतन्य जाधव याने, तर तिसरे पारितोषिक नाशिकच्याच जी. डी. सावंत महाविद्यालयातील कामाक्षा मोरे आणि माला गांगुर्डे यांना विभागून देण्यात आले. मानाचा काव्य करंडक चांडक-विटको महाविद्यालयाने पटकाविला. प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे आणि प्रा. गंगाधर अहिरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी कवी प्रा. शिंदे आणि कवी तपासे यांनी ‘कविता मनामनातली’ हा कार्यक्रम सादर केला. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात काव्यविचार मांडले. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर, प्रा. डॉ. आठवले आणि मेघना भागवत यांनी केले.

Story img Loader