नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारने हे काम ४ जूनपर्यंत सुरू झाल्यास ५ जूनला मुंबईत मंत्रालयासमोर आत्मघातीपणा करण्याचा इशारा देणारे निवेदन लोककार्य आणि लोकक्रांती दल संघटनेचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्य सचिव जे. एस. सहारिया व सर्व मंत्र्यांना पाठवले आहे.
ढगे यांनी निवेदनात म्हटले, की नगर-पुणे रस्त्याचा भाग असलेला नगर ते शिरूर हा रस्ता व शहरातील उड्डाणपुलाचे काम सरकारने खासगीकरणांतर्गत चेतक एंटरप्रायजेस या उद्योजकास सन २००७ दिले. निवेदेनुसार उद्योजकास १६ जानेवारी २०१० पर्यंत ३० मीटर रुंदीची जागा देणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या लांबीची ही जागा २५ सप्टेंबर २०१२ रोजी दिली गेली. त्यामुळे उद्योजकाने दरसूचीप्रमाणे पुलाची सुधारित किंमत ७५ कोटी रु. मिळावी, अशी मागणी केली. त्यावर संबंधितांकडून काहीच कार्यवाही झाली नाही.
उद्योजकाकडून हे काम काढून घेऊन कारवाई करून त्याच्याच खर्चाने उड्डाणपुलाचे काम करण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी डिसेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर केला, त्यावरही सरकारने काहीच कार्यवाही केली नाही, पुलाच्या किमतीचा वा बांधकाम खात्यातील वाद निविदेतील शर्तीनुसार मिटवण्यासाठी लवाद स्थापन करण्यात आले. लवाद मंडळाची पहिली बैठक नाशिकला ६ जानेवारी २०१४ रोजी झाली, त्यानुसार जागा हस्तांतरित करूनही उद्योजकाने काम न सुरू केल्याने उद्योजकाच्या अपूर्ण कामाच्या किमतीच्या प्रमाणात सवलती कमी करण्याचा प्रस्ताव २८ फेब्रुवारी २०१४ रोजी पाठवला गेला, त्यालाही मंजुरी मिळाली नाही. पुलाचे ८१ कोटी रुपयांचे काम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव २५ फेब्रुवारी २०१४ रोजी सादर झाला, मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने त्यावर अद्यापि कार्यवाही केली नाही, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

Story img Loader