अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात विषसदृश भुकटी आढळल्याच्या प्रकाराने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे खळबळ उडाली आहे. यात खाऊ शिजवणाऱ्या दोन्ही सेवकांनी एकमेकांवर आरोप करीत पाथरी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दिल्या. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी गावात जाऊन खाऊचा नमुना ताब्यात घेतला.
वाघाळा येथे ३ अंगणवाडय़ा असून त्यात शंभराहून अधिक बालके आहेत. या सर्व बालकांना व गावातील गरोदर मातांना याच अंगणवाडय़ांत पोषणआहार दिला जातो. खाऊ शिजविण्याचे कंत्राट गावातील जयभवानी महिला बचत गटास दिले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या जि. प. शाळेतील खाऊ शिजविण्याचे काम समर्थ महिला बचतगटास दिले आहे. या दोन्ही गटांसाठी खाऊ शिजविण्याचे काम अण्णा खिस्ते व दत्ता लोणकर करतात. बुधवारी सकाळी साडेसात वाजता लोणकर व खिस्ते या दोघांमध्ये अचानक हाणामारी सुरू झाली. लोणकरने खाऊत विष टाकले, असा आरोप करीत खिस्तेने त्याला मारहाण केली, तर लोणकरने खिस्तेवर हाच आरोप लावला. मोठमोठय़ा आवाजात होत असलेले भांडण ऐकूण ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
अंगणवाडीतील खाऊमध्ये विषसदृश भुकटी, तसेच कागदाच्या पुडय़ा आढळून आल्या. या प्रकाराने ग्रामस्थही भयभीत झाले. काही वेळातच २००-३०० च्या संख्येने ग्रामस्थ शाळेत आले. बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एच. पठाण यांनी तत्काळ गावात येऊन खाऊ ताब्यात घेतला. जि. प. सदस्य दादासाहेब टेंगसे यांनीही ग्रामस्थांची भेट घेतली. दुपारी खिस्ते व लोणकर या दोघांनीही पाथरी पोलिसात परस्परांविरुद्ध खाऊत विष कालविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अंगणवाडीतील खाऊ व सापडलेल्या पावडरचे नमुने ताब्यात घेत परभणीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवले. खाऊमध्ये विष आढळल्यास दोषींवर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलीस निरीक्षक एन. बी. ठाकूर यांनी स्पष्ट केले. चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच विकास घुमरे, गणेश घुमरे, माणिक घुमरे, शेख इस्माईल आदी ग्रामस्थांनी केली.
अंगणवाडीतील खाऊत विषसदृश भुकटी
अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात विषसदृश भुकटी आढळल्याच्या प्रकाराने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे खळबळ उडाली आहे. यात खाऊ शिजवणाऱ्या दोन्ही सेवकांनी एकमेकांवर आरोप करीत पाथरी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दिल्या.
First published on: 03-07-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poison in nursery food