कराड : लॉजवरील कुंटणखाना आणि कराड उपनगरातील कॅफे हाऊस सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. कराड व मलकापूर परिसरातील १० कॅफेंवर पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील चार पथकांनी केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या कारवाईत अडकली. तर, लॉजवरील कुंटणखान्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या दहा कॅफेंवरील दोन तासांच्या कारवाईने खळबळ उडाली. वारंवार सूचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवरही गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला, तर सेवा रस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून, त्यामध्ये प्रेमीयुगुल तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून गुन्हा घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वास्तविक यापूर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्यूहरचना आखली आणि छापेमारी केली.
हेही वाचा >>>नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले !
दरम्यान, ओगलेवाडी (ता. कराड) येथील सम्राट लॉजवरील कुंटणखान्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांची सुटका केली. या लॉजवर दोन महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात सम्राट लॉजचा मालक, रुम बॉय, महिला एजंट यांचा समावेश आहे.
सम्राट लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोतया ग्राहक पाठवून पोलिसांनी माहितीची खात्री करून घेतली. आणि पोलीस उपाधीक्षक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी, शीतल माने, फौजदार अशोक वाडकर आदींच्या पथकांनी पाळत ठेवून या लॉजवर छापा टाकला. आणि दोन महिलांची सुटका केली. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केल्याचे उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले.