महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जळगाव जिल्हा अद्याप उल्लेखनीय कामगिरी करू न शकल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाने सहाव्या वर्षांत सुमारे ३०० गावे दत्तक घेतली आहेत. या गावांकडून चांगली कामगिरी व्हावी म्हणून पोलीस यंत्रणा नेटाने प्रयत्न करत आहे.
गावपातळीवरील छोटय़ा छोटय़ा कारणांवरून निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे पर्यवसान मोठय़ा तंटय़ात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंब, समाज व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत आणि अस्तित्वात असणारे तंटे सामोपचाराने आणि आवश्यक तिथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था या मोहिमेद्वारे दृष्टिपथास आली आहे. तंटामुक्त गावमोहिमेचे २०१२-१३ हे सहावे वर्ष असून त्यात जळगावमधील ११५१ गावे सहभागी झाली आहेत. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील एकूण २५६ गावे तंटामुक्त ठरली तर ११ गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातील तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या गावांची संख्या लक्षात घेतल्यास अद्याप ८०० हून अधिक गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे लक्षात येते. मोहिमेत अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा असल्याने जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाने २०१२-१३ वर्षांत सुमारे ३०० गावे दत्तक घेण्याची अनोखी संकल्पना मांडली. दत्तक घेतलेल्या गावांची जबाबदारी त्या त्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांवर सोपविण्यात आली आहे. उपरोक्त गावांकडे विशेष लक्ष देऊन तंटामुक्त गावसमितीला आवश्यक ती मदत करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमेत तंटे मिटविताना तंटामुक्त गावसमिती ही मध्यस्थ व प्रेरकाची भूमिका बजावते. त्याकरिता वेगवेगळ्या स्वरूपाच्या तंटय़ांचे संकलन, वर्गीकरण आणि नंतर ते मिटविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या कामात समिती सदस्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही प्रभावीपणे राबविल्या जाव्यात म्हणून संबंधित गावांमध्ये पोलीस कर्मचारी जाऊन सदस्यांना मार्गदर्शन करतात. दत्तक घेतलेल्या गावांनी तंटामुक्तीला पात्र ठरण्यासाठी शासनाने विहीत केलेले निकष पूर्ण करून अधिकाधिक गुण मिळवावे, असा प्रयत्न केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा