हर्षद कशाळकर
अलिबाग शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका लॉज मध्ये दोन लहान मुलांची हत्या करून जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. विवाहबाह्य संबधातून हा प्रकार घडल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर पर्यटन व्यवसायातील हलगर्जीपणा समोर आला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हातील माथेरानसह अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन हे तालुके कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास आली आहेत. दरवर्षी या परीसरात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी आपल्या जागेत पर्यटकांसाठी लहान मोठी निवास न्याहारी केंद्र सुरु केली आहेत. या केंद्रांवर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल होत असतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवली जात नसल्याचे अलिबाग मधील हत्या आणि आत्महत्याताकांडानंतर पोलीस तपासात समोर आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही.
दोन लहान मुलांची हत्या करून जोडप्याची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी नागाव येथील समुद्र किनाऱ्यावर एका महीलेची हत्या करून मृतदेह झुडपात टाकल्याचा प्रकार समोर आला होता. या खूनाचा उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही. डिसेंबर महिन्यात माथेरान येथील इंदीरा नगर परिसरात एका लॉज मध्ये एका महिलेला शीर नसलेला विवस्त्र मृतदेह आढळून आला. तीच्या सोबत लॉजवर आलेल्या व्यक्तीने तीची रात्री हत्या केली आणि तो पसार झाला. त्याने खोली भाड्याने घेतांना केलीली नोंदही खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलीसांनी तपास करून चोविस तासात मारेकऱ्याला अटक केली असली तरी या घटनेमुळे पर्यटन व्यवसायातील हलगर्जीपणा समोर आला आहे.
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेणे, त्यांची ओळख पटवून घेणे, ओळखपत्रांची एक प्रत मागून घेणे, त्यानंतरच पर्यटकांना प्रवेश देणे आवश्यक आहे. पोलीसांकडून पर्यटन व्यवसायिकांना याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यास फारसे गांभिर्याने घेतले जात नसल्याचे या प्रकरणावरुन पुन्हा एकदा समोर आले आहे.
गेल्या काही वर्षात अनधिकृत लॉजिंग बोर्डिंग, आणि निवास न्याहारी केंद्र उघडली जात आहेत. ज्यांची कुठेही नोंद केली जात नाही. बेकायदेशीरपणे हे उद्योग चालविले जातात. स्थानिकांना रोजगार मिळत असल्याने स्थानिक प्रशासनही याकडे डोळेझाक करते. यामुळे व्यावसायिकांमध्ये बेफीकरी वाढते. अनैतिक कारणांसाठी या या आडमार्गावरील खोल्यांचा वापर केला जात असल्याचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अशा अनधिकृत केंद्रांवर वचक ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रत्येक निवास न्याहरी केंद्राची, लॉजिंग बोर्डिंग केंद्रांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची नोंद ठेवणे, त्यांची ओळख पटवून त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. अन्यथा अलिबाग, नागाव आणि माथेरान सारखे प्रकार पुन्हा घडू शकतात.
आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची नोंद पर्यटक व्यवसायिकांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यांची ओखळपत्र घेऊन त्यांची एक प्रतही ठेऊन घेणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी या संदर्भातील सुचना दिल्या जातात पण व्यवसायिक त्याकडे दुर्लक्ष करातात. अलिबाग मधील घटना लक्षात घेऊन व्यवसायिकांनी योग्य काळजी घ्यायला हवी.- अशोक दुधे, पोलीस अधिक्षक रायगड</p>