लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्यांना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांनी पोलिसांच्या हाती यश आलं आहे. राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघे औरंगाबादचे असल्याची माहिती आहे.
सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस चोरीला गेल्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली होती. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास हा कळस चोरीला गेला होता. सुमारे एक लाख २५ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा मुलामा असलेला हा कळस एका भक्ताने दिला होता. याप्रकरणी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. परिसरात सीसीटीव्ही आणि कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.
चोरी झाल्यानंतर चोरांचा काहीच सुगावा लागत नसल्याने विश्वास नांगरे- पाटील यांनी लक्ष घातले होते. त्यावेळी ते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. पण त्यानंतरही यश हाती आलं नव्हतं. पण अखेर दीड वर्षांनी पोलीस चोरांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झाले आहेत.