कराड पंचात समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांच्या आयुष या मुलाचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना तळबीड पोलिसांनी कु-हाड, कोयता, चाकू अशा हत्यांरासह पकडले. या चौघांनी आम्ही आयुष बोराटे याचा खून करणार होतो अशी कबुली दिली असल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रीतम चंद्रकांत पाटील (वय ३१), सागर अशोक पवार ( ३५) व किरण मोहन पवार (३१, तिघेही रा. वहागाव, ता. कराड) आणि ऋषीकेश अशोक पाटील (२२ रा. येणके, ता. कराड) अशी या खूनाच्या कटातील अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
हेही वाचा >>> रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जुंपली; रुपाली चाकणकरांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलवडे हवेली गावच्या हद्दीत हॉटेल आनंद हे प्रीतम पाटील कराड हा चालवतो. या हॉटेलवर ७ जुलै २०२३ रोजी शिरवडे (ता. कराड) येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला असता आयुष बोराटे व हॉटेल चालक प्रीतम पाटील यांच्यात जेवणाच्या ऑर्डरवरुन वाद झाला. त्यावेळी आयुषने त्याचा भाऊ वेदांत, तसेच बाळू यादव यांना बोलावून आनंद हॉटेलची व दूचाकीची मोडतोड करून निघून गेले होते. हा राग मनात धरून हॉटेल चालक प्रीतम पाटील, तसेच त्याचा मित्र सागर पवार, किरण पवार, ऋषीकेश पाटील यांनी परवा सोमवारी (दि. १०) हॉटेल आनंद येथे एकत्र येवून आयुष बोराटे याचा खुन करण्याचा कट रचला.
हेही वाचा >>> परभणी: शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरुड निलंबित
यावेळी हॉटेलमध्ये असणारी कु-हाड, चाकू, कोयता घेवून दूचाकीच्या नंबर प्लेटला राख व माती फासून चौघे त्या दूचाकीवरुन शिरवडे गावाकडे जात असताना रात्रगस्तीवरील तळबीड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार वाघमारे व वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना बेलवडे हवेली येथे मंगळवारी (दि. ११) रात्री दोनच्या आढळले. त्यावेळी महिला पोलीस हवालदार वाघमारे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी संबंधितांना थांबण्याचा इशारा केला. यावेळी दूचाकी न थांबवता ते भरधाव वेगात निघून गेले. यावेळी पोलिसांनी ही दूचाकी तासवडे टोलनाक्याजवळ तासवडे औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर पकडली. यावेळी संशयितांनी आपण आयुष सुहास बोराटे याचा खुन करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. तर महामार्गाकडेला टाकलेली कु-हाड, चाकू, कोयता त्यांनी दाखविल्यानंतर पोलिसांना ते हस्तगत करून दूचाकी ताब्यात घेत या चौघा तरुणांना अटक केली. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे अधिक तपास करीत आहेत.